अखेर स्टार प्रवाहची आई कुठे काय करते ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. डिसेंबर २०१९ मध्ये सुरू झालेला आई कुठे काय करते या मालिकेचा प्रवास नोव्हेंबर २०२४ मध्ये संपणार. या पाच वर्षांच्या कालावधीत मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या मालिकेला प्रेक्षकांच्या टिकेलाही सामोरे जावे लागले. दोन कोविडचे काळ, लॉकडाऊन ही सर्व आव्हाने समोर असतानाही मालिकेच्या कलाकारांनी काम सुरू ठेवले. याच काळात मालिकेचा टीआरपीही प्रचंड वाढला. एवढं की वाहिनीने झी मराठीलाही मागे टाकलेलं पाहायला मिळालं.
स्टार प्रवाह वाहिनीचा चढता प्रवास सुरु झाला. याच मालिकेने रुपाली भोसले, मधुराणी गोखले प्रभुलकर अशा कलाकारांची घर घेण्याची स्वप्न पूर्ण झाली. पण आता याच मालिकेला लवकर निरोप द्यावा लागणार म्हणून कलाकार भावुक झाले आहेत. मालिकेने एवढ्या दिवसांचा प्रवास घडवून आणला, प्रेक्षकांच्या मनात जागा बनवून दिली, प्रसिद्धी दिली त्यामुळे निश्चितच ही कलाकार मंडळी जड अंतःकरणाने एकमेकांना निरोप देत आहेत. या प्रवासाची आठवण सांगणाऱ्या अनेक गोष्टी कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पाहायला मिळतात.
मालिकेचा खलनायक अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी या मालिकेच्या प्रवासाने भारावले आहेत. एक भली मोठी पोस्ट त्यांनी या प्रवासाबद्दल लिहिलेली आहे. पाहुणे कलाकार, सहकलाकार या सर्वांना त्यांनी आभार व्यक्त करत आठवणी मनाच्या कुपीत साचवून ठेवल्या आहेत. येत्या २ डिसेंबर पासून स्टार प्रवाह वाहिनी आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. त्यामुळे वाहिनीला हा मोठा निर्णय घ्यावा लागत आहे.