तुमचा मुलगा काही करू शकत नाही उंची नाही…धनंजय पोवारला ती घटना सांगताना छोटा पुढारीला अश्रू अनावर
मराठी बिग बॉसचा ५ वा सिजन सोशल मीडिया स्टार्सने गाजवलेला आहे. जान्हवी, निक्की, अरबाज, वैभव सारख्या तगड्या स्पर्धकांना या स्टार्सने चांगली टक्कर दिली आहे. खेळात तर हे सेलिब्रिटी तगडी टक्कर देत आहेच मात्र बोलण्यातही चांगला दम दाखवत आहेत. जान्हवी आणि सुरजच्या वादात सुरजला प्रेक्षकांनी सपोर्ट केलेला पाहायला मिळाला. तर वैभव सोबत झालेल्या भांडणात सुद्धा सूरज वरचढ ठरला. या एकजुटीचा परिणाम म्हणून की काय कॅप्टनसीच्या टास्कमध्ये अंकिता वालावलकरला पहिला कॅप्टन बनण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे प्रेक्षकही त्यांच्या या खेळीचं कौतुक करत आहेत. पण आता बिग बॉसच्या घरात भावुक क्षण पाहायला मिळत आहेत.
सुरुवातीला योगिता चव्हाणला घरच्यांच्या आठवणीने भावूक केले होते. तर सूरज चव्हाणही जुन्या आठवणीत रमलेला पाहायला मिळाला. इतके दिवस छोटा पुढारी सगळ्यांना समजावून सांगताना दिसला मात्र आज तो भावूक होऊन रडू लागला. छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरवडे हा गेली अनेक वर्षे राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. त्याच्या भाषणाची शाब्दिक फटकेबाजी भल्याभल्याना गप्प करायला भाग पाडते. घनश्याम दरवडे हा श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार गावचा. बहिणीनंतर आईवडिलांचा घनश्याम हा एकुलता एक मुलगा. शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला . घरची परिस्थिती बेताची त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील घारगावच्या आश्रम शाळेत तो शिकायला होता. पुढे विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान त्याची खरी ओळख बनली. बबनराव पाचपुतेंच्या विरोधात त्याने राहुल जगताप यांचा प्रचार केला. त्याच्या जोरदार भाषणाने बबनराव पाचपुते यांचा पराभव केला. इथूनच हा छोटा पुढारी बनून लोकप्रियता मिळवू लागला. पण लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळत असताना या घनश्यामला मात्र अनेकांनी वाईट अनुभव दिले.
काल बिग बॉसच्या घरात कॅप्टनसीचा टास्क हरल्यानंतर घनश्याम भावूक झाला. धनंजय पोवार यांच्याशी बोलताना तो मनातली खदखद बाहेर काढताना म्हणाला, ” लोकं येऊन घरच्यांना म्हणायचे की तुमचा मुलगा काही करू शकत नाही, त्याची उंची नाही आज तीच लोकं म्हणत असतील की यांचा मुलगा बिग बॉसमध्ये कसा काय गेला असेल?. ” हे बोलताना घनश्याम खूप भावूक झाला. तेव्हा त्याला समजावताना धनंजय पोवार यांनी एक सुंदर वाक्य म्हटले…” ज्याला शरीराची उंची मापता येत नाही त्याला मनाची उंची काय मापता येणार ?” या वाक्यावर घनश्याम धनंजय पोवरच्या मांडीवर डोकं ठेवून ओघळलेले अश्रू पुसू लागला. बिग बॉसच्या घरातला हा भावूक क्षण प्रेक्षकांनाही भावूक करून जाणारा ठरला आहे.