तब्बल १० वर्षानंतर कलावंत ढोल ताशा पथकाला “तडा”…कलाकारांच्या वादानंतर श्रुती मराठेने केली नवी सुरुवात
पुण्यातील गणपती उत्सवाचे एक खास आकर्षण म्हणजे ‘कलावंत’ ढोल ताशा पथक. या पथकात मराठी सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी सहभागी होऊन गणपती मिरवणुकीची शान वाढवतात. २०१४ साली सुरू झालेल्या या पथकाला आता मात्र मोठा तडा गेलेला पाहायला मिळतो आहे. कारण काही दिवसांपूर्वी अभिनेता आस्ताद काळेने कलावंत पथक सोडल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. २३ जुलै रोजी आस्तादने त्याची नाराजी जाहीर करताना म्हटले होते की, “कलावंत पथक सोडलं आहे. या पथकाशी, त्याच्या मिरवणुकांशी, वादनांशी माझा काहीही संबंध नाही. तेव्हा नवीन सभासद नोंदणी, तालमींचं वेळापत्रक, मिरवणुका इ. संबंधी मला संपर्क करू नये. धन्यवाद”. असे म्हणत आस्तादने त्याची नाराजी जाहीर केली होती.
कलावंत पथक सुरू करण्यामागे आस्तादचा मोठा हातभार होता. पण त्यानेच हे पथक सोडल्याने अंतर्गत वादाची ठिणगी कुठेतरी पडली असल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये श्रुती मराठे, आस्ताद काळे, अनुजा साठे, सौरभ गोखले या कलाकारांनी मिळून ‘ कलावंत’ पथकाची स्थापना केली होती. आस्तादच्या पथकातून एक्झिट नंतर आता श्रुती मराठेने तिच्या या कलावंत-२०२४ पथकाची धुरा सांभाळली आहे. श्रुती मराठेने सुरू केलेल्या या पथकाला आर जे श्रुती, सौरभ गोखले, सिद्धार्थ जाधव, अनुजा साठे, तेजस बर्वे, अभिजित खांडकेकर, कश्मिरा कुलकर्णी अशा कलाकारांची साथ मिळत आहे.
आस्ताद काळेच्या सोडचिठ्ठीनंतर या कलाकारांनी एकत्र येऊन कलावंत पथकाला आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. कलावंत या पथकात सहभागी झालेल्या सदस्यांनी पुण्यातील बाजीराव रोडवरील नूतन मराठी विद्यालयात सरावाला सुरुवात केली आहे. रविवारी ४ ऑगस्ट रोजी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वाद्य पूजनाचा शुभारंभ पार पडला. यावेळी पुनीत बालन, श्रीकृष्ण चितळे आणि मराठी सृष्टीतील कलावंतांनी हजेरी लावली होती.