आज ३० जुलै सांस्कृतिक, वनविभाग आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून एका मराठी अभिनेत्रीने त्यांच्यासाठी शुभेच्छा देणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामुळे ही अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मराठी बिग बॉसच्या पहिल्या वहिल्या सिजनची विजेती मेघा धाडे ही तिच्या परखड मतांसाठी नेहमीच चर्चेत असते. मराठी कलाकारांच्या बाजूने ती नेहमीच आपली मतं मांडण्याचा प्रयत्न करते. मेघा धाडे गेली अनेक वर्षे अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते.
अशातच आता तिची सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठीची पोस्ट चर्चेत आली आहे. राज्याचे सांस्कृतिक, मत्स्य विभाग मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त मेघा धाडे यांनी पोस्ट लिहिताना म्हटले आहे की, ” ज्यांच्या नावापुढे विकास पुरुष ही उपाधी अतिशय शोभून दिसते ,जे वाळवंटातही नंदनवन खुलवू शकतात अशी प्रचंड क्षमता असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते आणि सांस्कृतिक ,वनविभाग व मत्स्य व्यवसाय मंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा. सुधीर भाऊ आपल्या कार्याचा ओघ हा कायम असाच सुरू असू दे आपण कायम सुखात आनंदात असू देत , आपली प्रकृती ही कायम ठणठणीत असू दे जेणेकरून आपण घेतलेले लोकसेवेचे हे व्रत अखंड अविरत चालू राहील अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते . पुन्हा एकदा जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
मेघा धाडेच्या या पोस्टमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मेघा धाडे यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हातात घेतलेला असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रकोष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनय क्षेत्राच्या जोडीला राजकिय क्षेत्रात या कलाकार मंडळींनी आता प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. याअगोदर मराठी सेलिब्रिटींनी वेगवेगळ्या पक्षाचा झेंडा हातात घेऊन राजकारणात प्रवेश केलेला पहायला मिळाला होता. प्रिया बेर्डे, दीपाली सय्यद, निशा परुळेकर, सुरेखा कुडची या सेलिब्रिटींनी राजकारणात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे मेघा धाडे देखील अभिनय क्षेत्र सोडून राजकारणात सक्रिय झालेल्या आहेत.