अंबानीच नाही तर या मराठी उद्योजकांनंही केलं होतं महागडं लग्न.. मुंबईचे आधुनिकीकरण तसेच मुंबईत पहिली रेल्वे देखील ह्यांनीच आणली

गेल्या महिन्यात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा जगभर गाजली होती. या लग्नाचा तामझाम आणि अवाढव्य खर्च अख्ख्या जगाला दिपवून टाकणारा ठरला होता. पण तुम्हाला माहितीये असंच महागडं लग्न मुंबईच्या एका मराठी उद्योगपतीने केलं होतं. त्याकाळी लग्नाचा खर्च हजारोंच्या घरात गेला होता, याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आले होते. त्यावेळी महागडं लग्न म्हणून या लग्नाची सर्वत्र चर्चा झाली होती. ते मराठी उद्योजक होते ‘जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे उर्फ नाना शंकरशेठ ‘. ‘आधुनिक मुंबईचे शिल्पकार’ म्हणून नाना शंकर शेठ यांना ओळखले जाते. आज ३१ जुलै, नानांच्या स्मृतिदिनी त्यांच्या बद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

१० फेब्रुवारी १८०३ रोजी ठाण्यातील मुरबाड येथे जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शंकर शेठ हे मुंबईत दागिने आणि हिऱ्यांचे मोठे व्यापारी होते. शंकर ‘शेठ’ या नावाने त्यांना ओळखले जाऊ लागले. पुढे नानांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा खूप कमी वयातच त्यांच्यावर सर्व जबाबदारी येऊन पडली. नानांनी सगळी सूत्र हातात घेतल्यानंतर मुंबईचे आधुनिकीकरण करत मुलींसाठी शाळा उभारली. संस्कृत भाषेचं ज्ञान वाढावं म्हणून त्यांनी स्कॉलरशिप देण्यास सुरुवात केली. शिक्षणाशिवाय जनतेचा उद्धार होणार नाही म्हणून त्यांनी ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. मुंबईचा वेगाने विकास व्हावा या उद्देशाने जवळचे मित्र जमशेदजी जिजीभाई यांच्या मदतीने त्यांनी मुंबईत पहिली रेल्वे आणली. १६ एप्रिल १८५३ मध्ये बोरिबंदर ते ठाणे पहिली रेल्वे धावली. अनेक शैक्षणिक संस्था तसेच सामाजिक संस्थेसाठी नानांनी सढळ हाताने देणगी दिली.

नानांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्या ६० व्या जन्मदिनी मुंबईकरांनी पैसे जमवून त्यांचा पुतळा भेट स्वरूपात दिला. मुंबई करांकडून जिवंतपणीच नानांना हा बहुमान मिळाला होता. ३१ जुलै १८६५ रोजी वयाच्या ६२ व्या वर्षी नानांचे निधन झाले. नानांचे वंशज आजही कौटुंबिक व्यवसाय तसेच नाना चौकातील कौटुंबिक मंदिराची देखभाल करतात. प्रसिद्ध पत्रकार संपादक असलेल्या अरुण टिकेकर यांनी नानांसाठी ‘मुंबईला आधुनिक बनवणारा महारथी’ असे गौरवोद्गार काढले.