महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने आजवर अनेक कलाकारांना घडवण्याचे काम केले आहे. गेली अनेक वर्षे ही कलाकार मंडळी या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या कलाकारांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये एक छान बॉंडिंग जुळून आलेलं आहे. अशातच आता ही कलाकार मंडळी आर्थिक दृष्टीनेही स्थिरस्थावर झालेली पाहायला मिळत आहेत. कारण महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील बऱ्याच कलाकारांचे घर घेण्याचे स्वप्न सत्यात उतरलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच नम्रता संभेराव हिने तिच्या गावी शेतघर बांधलेलं पाहायला मिळालं. या दिमाखदार उभ्या असलेल्या शेत घरात तिने गृहप्रवेश केलेला पाहायला मिळाला.
तर शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, प्रथमेश शिवलकर यांनीही स्वतःच्या घरात गृहप्रवेश करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. पण आता त्यांच्याच जोडीला माने या ना माने टॅग लाईनसाठी ओळखला जाणारा रोहित माने यानेही हक्काचे घर खरेदी केलेलं आहे. रोहित माने याने गृहप्रवेशाचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना ‘सुख कळले’ असे त्याला कॅप्शन दिले. रोहित हा मूळचा सातऱ्याचा. त्याच्या बोलण्यातच सातारच्या भाषेचा बाज कायम पाहायला मिळतो. कॉलेजमध्ये असल्यापासूनच रोहित नाटकातून काम करत असे. यात त्याने विविधांगी भूमिका साकारत अनेक बक्षिसं मिळवली होती. नाटक, मालिका, चित्रपट असा त्याचा यशस्वी प्रवास सुरु आहे.
पण त्याला खरी ओळख मिळवून दिली ती सोनी मराठीच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने. या शोमुळे रोहित प्रेक्षकांच्या मानत घर करताना दिसला. हक्काच्या घराची स्वप्न उराशी बाळगून असलेल्या कलाकारांमध्ये तोही एक होता. या प्रवासात त्याला पत्नी श्रद्धाची मोठी साथ मिळाली. यशाचा एक एक पल्ला गाठत आज त्याने त्याच्या हक्काचं घर पूर्णत्वास आणलं आहे. रोहित माने याला त्याच्या या नवीन घरासाठी अभिनंदन आणि तो अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो हीच सदिच्छा.