मालिकेत काहीही दाखवतात दोघात तिसरा आल्याशिवाय मालिकाच…आई कुठे काय करते मालिकेच्या लेखिकेचं मालिकेवरचं पहिलं पुस्तक
टिव्हीवरची कुठलीही मालिका असो त्यात पाणी घालून कथानक वाढवण्याशिवाय लेखकांना पर्याय नसतो. नवनवीन ट्विस्ट, नवीन पात्रांची एन्ट्री अशा कित्येक बदलांसाठी मालिकेच्या कथानकाला वाढवण्यात लेखकांचा हातखंडा असतो. पण या नवनवीन ट्विस्टमुळे मालिका कुठेतरी भरकटलेली पाहायला मिळते. परिणामी प्रेक्षक अशा मालिकेकडे पाठ फिरवताना दिसतात. त्यामुळे सहाजिकच मालिकेचा टीआरपी खाली येऊन ती मालिका बंद करावी लागते. दरम्यान आता प्रेक्षकांना सोशल मीडिया सारखा पर्याय उपलब्ध झाल्याने मालिकेच्या कलाकार, दिगदर्शक आणि लेखकाला त्यांच्या टीकेला सामोरे जावे लागते. पाणी घालवणे थांबवा, लेखक डोक्यावर पडला आहे का, दोघात तिसरा दाखवल्याशिवाय मालिका पूर्णच होत नाही का असे अनेक प्रश्नांचा भडिमार सुरू असतो.
पण मालिका चालू ठेवायची असेल तर त्याला पर्यायही शोधावे लागतात हे लेखकाचे त्यावर उत्तर असते. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करते या मालिकेला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या मालिकेची लेखिका मुग्धा गोडबोले हिला देखील या ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण कालांतराने या मालिकेतून मुग्धाने काढता पाय घेतला. नवीन काम स्विकारण्याच्या हेतून तिने या मालिकेचे संवाद लेखन थांबवले होते. याच अनुषंगाने मुग्धाने टीव्ही मालिकेवरच एक पुस्तक लिहिलं आहे. ‘टीव्ही मालिका आणि बरंच काही’ असे तिच्या या पुस्तकाचे नाव आहे. मुग्धाने पहिल्यांदाच पुस्तक लिहिण्याचे धाडस दाखवले आहे. खरं तर मालिकेसाठी लेखिका होणं हे एक मोठं आव्हानच असतं. हे खरं तर खूप अवघड काम आहे कारण या अर्ध्या तासात प्रेक्षकांना टीव्ही समोर खिळवून ठेवण्याचे काम लेखकाला करावं लागतं.
याचाच विचार करून मुग्धाने हे पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. रोजची आव्हानं, पडद्यामागची गणितं उलगडावीत या हेतूने तिने हे पुस्तक लिहिले आहे. याबद्दल मुग्धा म्हणते की, ” गेल्या तीन चार वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर जास्त होऊ लागला आहे. या माध्यमातून कलाकारांना, लेखकांना वाटेल त्या भाषेत ट्रोलिंग केलं जात आहे. प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. पण या सगळ्यांची उत्तरं देता यावीत म्हणून मी हे पुस्तक लिहिलं आहे. आमच्या भावना काय असतात, त्यामागची भूमिका काय असते हे त्यांनाही कळायला हवं एवढंच मत आहे.”