नवीन मालिका आणि शोच्या एन्ट्रीमुळे जुन्या मालिकांना डच्चू द्यावा लागतो. अर्थात वाहिनीचा टीआरपी कमी झाला की या गोष्टी सर्रासपणे पाहायला मिळतात. पण काही वेळेला मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेतही बदल घडून येत असतो. असाच काहीसा निरोप आता मराठी मालिकांना घ्यावा लागणार आहे. येत्या २८ जुलै रोजी रात्री ९ वाजता बहुप्रतिक्षित मराठी बिग बॉसच्या ५ व्या सिजनचा ग्रँड प्रीमियर टेलिकास्ट होत आहे. त्यामुळे कलर्स मराठीच्या दोन मालिकांना निरोप घ्यावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठी बिग बॉसचा ५ वा सिजन सुरू होणार अशी कलर्स मराठीने घोषणा केली होती.
पण हा शो नेमका कधी येणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली होती. पण आता ही उत्सुकता ताणून न धरता वाहिनीने दोन मालिकेला डच्चू देत शो सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कलर्स मराठीची पिरतीचा वणवा उरी पेटला आणि रमा राघव या दोन मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. काहीच दिवसांपूर्वी पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेचे कलाकार रसिका वाखारकर आणि इंद्रनील कामत यांनी अशोक सराफ यांची भेट घेतली होती. अशोक सराफ यांना मालिका पाहायला आवडत नाहीत पण पिरतीचा वणवा उरी पेटला ही मालिका ते न चुकता रोज बघत असतात.
ही माहिती तेजश्री प्रधानने या कलाकारांना कळवली होती. तिनेच अशोक सराफ आणि या कलाकारांची भेट घडवून आणली होती. पण आता मालिका निरोप घेतेय म्हटल्यावर अशोक सराफ यावर नक्कीच नाराज झाले असतील. दरम्यान रमा राघव ही मालिकाही प्रेक्षकांचा निरोप घेत आहे त्यामुळे मालिकेचे कथानक आता निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. या आठवड्यात मालिकेचे शेवटचे शूट पाहायला मिळत आहे. जवळपास दीड वर्ष एकत्रित काम करत असल्याने या कलाकारांमध्ये एक छान बॉंडिंग जुळून आले होते. त्यामुळे निश्चितच ही सगळी कलाकार मंडळी भावूक झाली आहेत.