अभिनेता सुयश टिळक याने पालकांच्या वागणुकीवर एक चिंता व्यक्त केली आहे. काल सोमवारी सुयश टिळक एका हॉटेलमध्ये गेला होता. तिथेच त्याच्या समोरच एक फॅमिली जेवायला बसली होती. त्या फॅमिलीमध्ये एक मूल होतं ते खूपच आरडाओरडा करत होतं. ते मूल रडू नये गप्प राहावं म्हणून त्या पालकांनी त्याच्या हातात मोबाईल दिला. त्यावर कार्टून लावुन दिलं. पण त्या व्हिडिओतील लहान मुलांच्या तोंडी असलेलं ते संभाषण पाहून सुयश टिळक मात्र चिंताग्रस्त झाला. तीन कार्टुनिस्ट असलेल्या या संभाषणात बॉयफ्रेंड आणि फ्रेंडबद्दल बोलण्यात आलं होतं. आता हे शब्द त्या लहान जीवाला आतापासूनच उमगायला लागले तर त्यांचं भविष्य काय असेल याबद्दल सुयशला काळजी वाटू लागली.
अशा पालकांनी आपल्या मुलांना काय दाखवायचं हेही कळू नये का? असा प्रश्न सुयशने यावेळी उपस्थित केला. ही सर्व घटना त्याने सांगत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवायला हवं. मोबाईल हातात देऊन त्याला शांत बसवता येतं पण ते मूल त्यातून काय शिकतोय याकडे लक्ष देणं तेवढंच महत्वाचं आहे. मनोरंजन म्हणून आतापासूनच त्याला अशा गोष्टी शिकायला मिळत असतील तर ही विचार करण्यासारखी बाब म्हणावी लागेल. सुयशच्या या व्हिडिओवर सेलिब्रिटी देखील व्यक्त होत आहेत. लॉकडाऊन नंतर शिक्षणाची सर्व गणितंच बदललेली पाहायला मिळाली होती.
मुलांना शालेय अभ्यासक्रम मोबाईलमध्ये पाहावा लागत असल्याने मुलांच्या हातात मोबाईल फोन येऊ लागले. पण आता शाळा नियमितपणे सुरू झाल्यानंतरही या मुलांच्या हातून मोबाईल सुटलेले नाहीत. परिणामी ज्या गोष्टी शिकायच्या त्या बाजूला राहून मुलांचे दुसरेच उद्योग सुरू असतात. पालकांनी अशा गोष्टींना वेळीच आळा घालायला हवा. दरम्यान या मोबाईलच्या अति वापराने मेंदूवर दुष्परिणाम झाल्याच्या अनेक घटना आता उघडकीस येऊ लागल्या आहेत. मुलांना शांत करायचे अनेक पर्याय आहेत. त्यांना मोबाईल मध्ये गुंतवून ठेवण्यापेक्षा वेळीच सावध व्हा असाही सल्ला यातून दिला जात आहे.