१९८९ साली बिपीन वर्टी दिग्दर्शित ‘फेका फेकी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अशोक सराफ, सविता प्रभुणे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, अजय वाढवकर, चेतन दळवी, प्रतिभा गोरेगावकर, आराधना यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात सविता प्रभुणे यांच्या बहिणीची म्हणजेच रश्मीची भूमिका अभिनेत्री आराधना देशपांडे यांनी साकारली होती. आराधना देशपांडे यांनी अनेक चित्रपट मालिका तसेच नाटकातून काम केले आहे मात्र आता त्या या क्षेत्रापासून थोड्याशा दुरावलेल्या पाहायला मिळतात. आराधना देशपांडे यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
फेका फेकी या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 35 वर्ष झाली आहेत. आराधना देशपांडे यांनी या चित्रपटात अशोक सराफ यांच्या मेहुणीची भूमिका साकारली होती. आराधना देशपांडे यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. नाटक, चित्रपट आणि दूरदर्शनवरील मालिका अशा मराठी आणि हिंदी भाषिक दोन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्या ऑल इंडिया रेडिओ (AIR) सेवेच्या आकाशवाणीवर सादरीकरण करत होत्या तसेच अनेक स्टेज शो त्यांनी सादर केलेले आहेत. मराठी रंगभूमीवरील कारकिर्दीत आराधना यांनी विनय आपटे, सुरेश खरे, बाळ कोल्हटकर, विजय गोखले, रंजन दारव्हेकर अशा मोठंमोठ्या व्यक्तींसोबत काम केले आहे. ‘वन रूम किचन’, ‘तुला हवंय काय’ , ‘रायगडाला जेव्हा जग येतं’ या नाटकांतून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
आई पाहीजे’, ‘दे टाळी’, ‘फेकाफेकी’, ‘रंगत संगत’ , ‘सारेच सरस’ अशा मराठी चित्रपटांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. नसीरुद्दीन शाह आणि पल्लवी जोशी यांच्यासोबत लोकप्रिय ‘पनाह’, ‘सनम हम है आपके’ आणि ‘बेदर्दी’ यासह बॉलिवूड चित्रपटांमधील त्यांच्या कामाची दखल घेतली गेली. आराधना देशपांडे यांनी अधिकारी ब्रदर्स निर्मित मालिकांमध्ये महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. ‘परमवीर’, ‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘बंदिनी’, ‘धनंजय’, ‘संसार माझा वेगळा’, ‘घरकुल’, ‘दामिनी’ ही त्यांची मालिकेतील काही उल्लेखनीय कामे होती. ‘तांडा चालला’, ‘आई’, ‘एक होता राजा’ आणि ‘चार दिवस सासूचे’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या आहेत.
मराठीसह ‘कौन अपना कौन पराया’, ‘सर्च’, ‘खोज’, ‘सुहाग’ आणि ‘सीआयडी’ या हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिकांना लोकप्रियता मिळाली होती. एक अभिनेत्री म्हणून यशस्वी कारकिर्दीव्यतिरिक्त आराधना यांनी भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये देखील रस दाखवला. आराधना देशपांडे सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत मात्र जुन्या मराठी हिंदी गाण्यांवर रील बनवणे त्यांना आजही आवडते.