सैराट चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला तानाजी गळगुंडे आता अभिनय क्षेत्रात चांगला स्थिरावलेला पाहायला मिळतो आहे. नागराज मंजुळे यांच्यामुळे हे शक्य झालं अशी तो आजही प्रामाणिकपणे कबुली देताना दिसतो. तानाजीने काही दिवसांपूर्वी आरपारला एक मूलाखत दिली होती. त्यातील त्याची लग्नाबद्दलची व्याख्या चर्चेचा विषय ठरली होती. लग्नात होणारा अवाढव्य खर्च टाळून रजिस्टर पद्धतीने तुम्ही लग्न करू शकता असे त्याचे याबद्दल ठोक मत होते. पण तो असं का बोलला यालाही एक कारण होते. तानाजी त्याच्या मित्रासोबत एकत्र पुण्यात राहायला होता. जेव्हा त्याच्या या मित्राचं लग्न ठरलं तेव्हा त्या मुलाने गावाकडं घर बांधलं , धामधुमीत लग्न केलं तेव्हा हा खर्च करण्यासाठी त्याने बँकेतून कर्ज काढलं.
पण आता तो बायकोसोबत पुण्यात राहायला आला आहे. तो गायनाचे क्लासेस घेतो. पण डोक्यावर कर्ज असल्याने त्याचं मन अस्थिर झालेलं तानाजीने पाहिलं आहे. त्याचमुळे लग्न करायचं असेल तर ते कमी खर्चातही करू शकतो असे तो या मुलाखतीत सांगताना दिसतो. याच मुलाखतीत तानाजीने त्याच्या गर्लफ्रेंडचाही खुलासा केलेला आहे. गेल्या ५ ते ६ वर्षांपासून ते दोघे रिलेशनशिप मध्ये आहेत. याबद्दल तो म्हणतो की, ” माझी जी गर्लफ्रेंड आहे ती दुसऱ्या कास्टची आहे. आम्ही गेली ५-६ वर्षे एकमेकांसोबत आहोत. आम्ही अनेकदा एकत्र भेटतो, बोलतो. माझ्या ऑपरेशनच्या काळात तिनेच माझी खूप काळजी घेतली होती. पण आईला जेव्हा हे कळलं की आम्ही दोघ लिव्हइन मध्ये राहतो तेव्हा तिने माझ्यासोबत भांडण केलं. तिला ते बिलकुल मान्य नव्हतं.
ती मुलगी दुसऱ्या कास्टची आहे हे आईला माहीत होतं कारण त्या मुलीची आई आमच्या गावातली आहे. त्या मुलीसोबत एकत्र राहायचं तिच्याशी लग्न करायचं नाही असं माझी आई मला म्हणाली. तू दुसरी कोणीही कर अगदी दुसऱ्या कुठल्याही जातीची कर पण तिला करू नको, कारण ती मुलगी आपल्या गावातल्या लोकांना माहितीतली आहे असं तिचं म्हणणं होतं. ती वेगळ्या जातीची आहे हे गावातल्या लोकांना समजू नये म्हणून ती असं म्हणत होती. मला तिचं ते म्हणणं पटत नव्हतं. मी सौरट अगोदर गावाकडं होतो तेव्हा त्याच विचाराचा मी होतो. पण जसजसा पुस्तकांशी, चांगल्या व्यक्तींशी संबंध आला तसतसे माझ्यातील विचार सुधारत गेले. त्या मुलीच्याही घरचे पुढारलेले आहेत त्यांना आमचं नातं मान्य आहे.”