ना धों ताम्हणकर यांच्या गोट्या या कादंबरीवर आधारित ‘गोट्या’ ही मालिका ९० च्या दशक९० च्या दशकात दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित होत होती. या मालिकेत जॉय घाणेकर गोट्याच्या प्रमुख भूमिकेत दिसला होता . भय्या उपासनी, मानसी मागिकर, सुहास भालेकर, सविता मालपेकर, प्राची साठे, संपदा जोशी असे बरेचसे कलाकार मंडळी महत्वाची भूमिका साकारताना त्यात दिसले होते. या मालिकेची खासियत अशी होती की ही मालिका १३ च्या पटीत वाढवून मिळत होती. २६ भाग झाल्यावर ही मालिका लोकप्रियता मिळवत असल्याचे पाहून ३९ भागापर्यंत वाढवून मिळाली होती. मात्र ३३ व्या एपिसोडला मालिकेचे दिग्दर्शक राजदत्त यांनी ‘आता आणखी पाणी घालणं शक्य नाही’ असे स्पष्ट केले होते.
मालिकेमुळे लोकप्रियता मिळवलेला बालकलाकर आज काय करतो याची उत्सुकता अनेकांना होती ती माहिती आपण कालच दिली आज आपण मालिकेतील ‘राधाक्का’ साकारणाऱ्या अभिनेत्री बद्दल खास गोष्टी जाणून घेऊयात. गोट्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा बनवली आहे. नुसते नाव काढले तरी आजही या मालिकेच्या आठवणी ताज्या होतात. आज या मालिकेच्या राधाक्काची ओळख करून घेऊयात. मालिकेतील राधाक्का या गोट्याला आजी समान होत्या. त्यांनीच गोट्याच्या आईला (सुमनला) लहानाचे मोठे होताना पाहिले होते. तिचं लग्नही जुळवून दिले होते. ही भूमिका अभिनेत्री सुमन धर्माधिकारी यांनी साकारली होती. घार हिंडते आकाशी, जावई विकत घेणे आहे अशा नाटक सिनेमातून त्यांनी काम केलं होतं.
राणी, नीलिमा आणि वंदना या तीन कन्या आणि नातवंड असा मोठा परिवार त्यांचा आहे. वयोपरत्वे आता त्या खूप थकल्या आहेत पण अभिनयाची आवड त्यांना आजही स्वस्थ बसू देत नाही. मध्यंतरी त्यांच्या नातवंडाने युट्युबच्या माध्यमातून त्यांना पुन्हा या दुनियेत आणण्याचा प्रयत्न केला होता. अगदी खुर्चीवर बसूनही त्या त्यांचा सजग अभिनय या व्हिडिओतून दाखवताना दिसल्या. गोट्या मालिकेने सुमन धर्माधिकारी यांना एक मोठी ओळख मिळवून दिली आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मालिकेची आठवण येईल तेव्हा हे कलाकारही चर्चेत राहतील.