केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी भीक मागावी लागतेय ..हिंदी मालिकेत काम केलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची खंत
आपल्या केलेल्या कामाचा मोबदला वेळच्यावेळी मिळावा म्हणून सर्वचजण प्रयत्न करत असतात. पण इथे ४ वर्ष होऊनही निर्मात्याला भीक मागीतल्यासारखे स्वतःचेच पैसे मागावे लागतात तेव्हा कुठेतरी त्याचा संयम सुटतो असेच चित्र मराठी कलाकारांच्या बाबतीत दिसून येते. मराठी सृष्टीत ही उदाहरणे समोर आली पण आता हिंदी मालिकेतील मराठी कलाकारांना देखील अशाच गोष्टीला सामोरे जावे लागत आहे. विद्या या हिंदी मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री मीरा देवस्थळे हिने या प्रकरणी आवाज उठवला आहे. माझ्याप्रमाणे आणखी काही कलाकारांचे पैसे अडकलेत पण मी आवाज उठवला असे मीरा तिच्या या पोस्टमध्ये म्हणते. याबद्दल मीरा सविस्तरपणे लिहिते की, “महेश पांडे प्रॉडक्शन, आता ४ वर्षे झाली आहेत. प्रॉडक्शन हाऊसने विद्यानंतर गुप्ता ब्रदर्सची निर्मिती केली. तुम्ही स्वतः एका आघाडीच्या GEC चॅनेलवर प्रोग्रामिंग प्रमुख म्हणून काम केले आहे.
हे प्रॉडक्शन हाऊस सतत काम करत आहे. गेली ४ वर्षे टीडीएस देणी न भरणे आणि मला भीक मागायला लावणे हा शुद्ध छळ आहे. ४ वर्षांपूर्वी कापलेली टीडीएस तुम्ही अजूनही सरकारला भरलेली नाही. माझ्या कष्टाचे पैसे देऊन माझ्यावर कोणताही उपकार करत नाही. तक्रार करणारी मी एकटीच नाहीए. पण मी स्वतः मिडियासमोर हे बोलून दाखवत आहे. हा अन्याय असह्य आहे. मला माझे हक्काचे पैसे द्या”. दरम्यान २०१९ पासून मीरा देवस्थळे ही विद्या या मालिकेत काम करत होती, हा शो मार्च २०२० मध्ये संपला आणि मी अजूनही माझ्या हक्काच्या पैशाची वाट पाहत आहे. प्रॉडक्शन हाऊसकडे माझे ३,७८,००० रुपये आहेत. मूळ रक्कम सुमारे `८ लाख रुपये इतकी होती. मी जुलै २०२२ मध्ये CINTAA शी संपर्क साधला त्यानंतर त्यातील फक्त एक भाग मंजूर करण्यात आला. मी मे २०२३ मध्ये बांगूर नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती, परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. निर्माते महेश पांडे यांनी आता माझ्या मेसेजेसला आणि कॉलला प्रतिसाद देणे बंद केले आहे.
त्यांनी टीडीएस देखील भरलेला नाही, जो माझ्या मानधनातून कापला गेला होता आणि आता दंडामुळे तो वाढत चालला आहे.” मीरा गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. “माझ्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती म्हणून माझ्यावर एक जबाबदारी आहे. काहींना ही रक्कम महत्त्वाची वाटत नसली तरी केलेल्या कामाचा पैसा माझ्यासाठी तेवढाच मोलाचा आहे . स्वत:च्या कष्टाने कमावलेल्या पैशासाठी मला भीक का मागावी लागते? कोणत्याही मालिकेनंतर लगेचच काम मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे, काम नव्हते त्या काळात मी माझ्या जवळ असलेल्या पैशांवर अवलंबून होते. मला माझ्या कामाचे पैसे मिळायलाच पाहिजे.” असे म्हणत मिराने सोशल मीडियावर निर्मात्याविरोधात संताप व्यक्त केला आहे.