गौतमी पाटील सारखी पोरगी स्टेजवर पाण्याचे फवारे अंगावर उडवून… लोककलेचा वारसा जपणाऱ्या कलावंताने व्यक्त केलं मत
लोककलेचा वारसा जपणाऱ्या कलावंतांपैकी एक म्हणून प्राध्यापक डॉ गणेश चंदनशिवे यांनी स्वतःची एक वेगळी ओळख जपली आहे. चंदनशिवे हे लोककलेचे अभ्यासक तर आहेच पण लोक रंगभूमीवरील तमाशाचं बदलतं स्वरूप यावरही त्यांनी अभ्यास केला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लावणीच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य केलं आहे त्यात त्यांनी गौतमी पाटील हिच्यावरही निशाणा साधला आहे. चित्रपटात जशी लावणी सादर केली जाते ती प्रत्यक्षात दाखवली जात नाही. ” चित्रपटात जशी सोनाली कुलकर्णी दाखवली तशी बोर्डावर दाखवता येत नाही. ही परंपरा खराब होत चाललेली आहे. आता मध्यंतरी गौतमी पाटील सारखी पोरगी आली ती मुळात लावणी करतच नाही.
ती आयटम सॉंग करते पण लोकांनी ते लावणीवर खपवलं. त्यामुळे लावणी भ्रष्ट झाली. ज्या लावणीला एवढा मोठा इतिहास आहे त्याला कुठेतरी डाग लागल्यासारखा झाला. त्यानंतर लोकांकडून कमेंट्स येऊ लागल्या, त्यावर एवढी काँट्रॅव्हर्सि झाली तेव्हा तिनेच समोर येऊन मान्य केलं की लावणी करतच नाही. मुळातच लावणीला एक मोठी परंपरा आहे. सखुबाई, कोल्हापूरबाई, यमुनाबाई, लक्ष्मीबाई, रोशनबाई यांनी ही परंपरा जपली आहे. डोईवरचा पदर यांनी ढळू दिला नाही. मग परंपरा भ्रष्ट करण्याचा यांना अधिकार नाही. तुम्ही आयटम सॉंग करता स्टेजवर पाण्याचे फवारे उडवून घेता त्यात तुम्ही कसे दिसता. पण यामुळे लोकांना आताच्या पिढीलाही असच वाटेल की लावणीला अशीच परंपरा आहे.
यातून आम्ही मार्ग काढत चाललो आहोत की या परंपरेला कसं उच्च पदावर नेता येईल. काळू बाळू, विठाबाई, दत्तोबा तांबे, दगडुबा शिरोळीकर, तुकाराम खेडकर, मंगला बनसोडे यांना उगाच राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आहेत का?.. यांचं योगदान तेवढं आहे. आयोजकांना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही लावणी करा अगदी परदेशातल्या मुलींनाही घेऊन करा पण त्यात पारंपरिक फडावरच्या मुलींनाही संधी द्या. ” असं मत चंदनशिवे यांनी व्यक्त केलं आहे.