बराच वेळ रांगेत उभा होतो तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याने… मतदान केंद्रावर सचिन गोस्वामी यांना आला भन्नाट अनुभव
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचा एक स्वतंत्र चाहतावर्ग आहे. या शोने गेल्या आठ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. शोचे दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी केलं आहे. सचिन गोस्वामी हे केवळ दिग्दर्शकाच्याच भूमिकेत नाही तर कधीकधी कॅमेऱ्याच्या मागे राहूनही केवळ आवाजाच्या माध्यमातून स्किटमध्ये सहभागी होताना दिसतात. त्यामुळे गोस्वामी, मोटे या पडद्यामागील कलाकारांची ओळख शोच्या माध्यमातून झालेली आहे. गुलकंद या आगामी चित्रपटाचे ते दिग्दर्शन करत आहेत. हास्यजत्रामुळे विनोदाचे अचूक टायमिंग कसे ओळखायचे हे सचिन गोस्वामी यांना चांगलेच ठाऊक झाले आहे.
खऱ्या आयुष्यातही ते तितकेच मिश्किल आहेत असे म्हणायला हरकत नाही. नुकत्याच पार पडलेल्या मतदान केंद्रावर त्यांनी एक भन्नाट अनुभव घेतला आहे. हा किस्सा शेअर केल्यानंतर इंडस्ट्रीतील कलाकारांनी त्यांना मिश्किल प्रतिक्रिया दिल्या आहेत. काल अनेक ठिकाणी मतदान पार पडलं. सचिन गोस्वामी हे देखील पत्नीसह मतदान केंद्रावर दाखल झाले होते. तिथे घडलेला त्यांच्यासोबतचा एक प्रसंग त्यांच्याच शब्दात जाणून घेऊयात.
“काल मतदानाला मी आणि सविता सकाळीं ७: ३०ला केंद्रावर गेलो..नेमका आमचा नंबर असलेल्या खोली बाहेर मोठी रांग.. ड्युटी वरील पोलीस कर्मचारी मला निरखून बघत अंदाज काढत होता .शेवटी त्याने निष्कर्ष काढला आणि मला म्हणाला.. ओ तुम्ही तिथं का रांगेत? या इकडे इकडून आत जा..मी गडबडलो.. बराच वेळ उभं राहिल्याने पोटऱ्यात गोळे आले होतच..पडत्या फळाची आज्ञा म्हणून तिथं जाऊन थांबलो.. आता मी ३नंबर वर होतो..हळूच त्यांच्या कडे पाहून हसत थँकयू म्हटल.. त्यावर तो म्हणाला ओ, सिनियर सिटिझन रांगेत चक्कर येऊन पडले तर डोक्याला ताप आम्हालाच होणार नाही का?..
पांढऱ्या केसांनी सिनियर सिटिझन कॅटेगरीत आणलं आहे.. काय करावं…” आता या भन्नाट अनुभवानंतर मराठी सेलिब्रिटींनीही फिरकी घेत सचिन गोस्वामी यांना मिश्किल प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.