प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच टॉपचा शो दाखल होणार आहे. मराठी बिग बॉस हा कलर्स मराठी वाहिनीचा शो आहे. पण चौथ्या सिजननंतर हा शो कधी येणार अशी विचारणा होऊ लागली होती. कारण जवळपास दीड वर्षांपासून या शोचा पाचवा सिजन रखडला होता. पण आता लवकरच कलर्स मराठी वाहिनीने पाचव्या सिजनची घोषणा केलेली आहे. महत्वाचं म्हणजे या सिजनमध्ये महेश मांजरेकर यांना होस्ट म्हणून डावलण्यात आलेलं आहे आणि त्या जागी रितेश देशमुख ची वर्णी लागलेली आहे. रितेश देशमुख मराठी बिग बॉसच्या पाचव्या सोजनचे होस्टिंग करणार आहे. नुकतीच या शोची पहिली झलक प्रेक्षकांच्या समोर आली आहे. त्यात रितेश देशमुखला पाहून सर्वांनी उत्साहवर्धक प्रतिक्रिया दिलेल्या आहे.
मराठी बिग बॉसचा ४ था सिजन हा म्हणावा तसा टीआरपी मिळवण्यात अयशस्वी ठरला होता. त्यामुळे या शोकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. हा शो वादग्रस्त असल्याने अनेकदा त्यावर टीका करण्यात आली. पण प्रेक्षकांना हा शो आवडतो हे त्यांनी सुरुवातीच्या तीन सिजनमध्ये दाखवून दिले होते. दरम्यान कलर्स मराठीची धुरा आता केदार शिंदे साकारत आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांत वाहिनीवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या पण मराठी बिग बॉसचा ५ वा सिजन कधी येणार अशी मागणी करण्यात येऊ लागली. आम्हाला मराठी बिग बॉस हवाय ही मागणी करणाऱ्या प्रेक्षकांची इच्छा आता लवकरच पूर्ण होत आहे. दरम्यान आताच्या सिजनमध्ये तगड्या स्पर्धकांना बोलवा अशी मागणी करण्यात येत आहे. जेवढे तगडी स्पर्धक तेवढी शोची लोकप्रियता वाढेल असा विश्वास प्रेक्षकांनी दिला आहे.
दरम्यान आता महेश मांजरेकर नंतर रितेश देशमुख सूत्रसंचालक म्हणून पहिल्यांदाच धुरा सांभाळणार आहे. त्यासाठी त्याचे चाहत्यांकडून स्वागतच केले जात आहे. रितेश प्रेक्षकांची अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. महेश मांजरेकर हे त्यांच्या चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले जाते. या वर्षात जवळपास पाच चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे त्यांनी मराठी बिग बॉसचे सूत्रसंचालन नाकारले का? अशी चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांत यावरचा पडदा लवकरच हटवण्यात येईल. तूर्तास रितेश देशमुखला या नवीन भूमिकेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.