मालिका असो किंवा चित्रपट या माध्यमात मुख्य भूमिकेइतकीच सहाय्यक भूमिकाही तेवढीच महत्वाची असते. हे सहाय्यक भूमिकेत झळकणारे कलाकार त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करून असतात. उत्तम अभिनयाची जाण आणि निस्सीम सौंदर्य यामुळे हे कलाकार चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरतात. मराठी इंडस्ट्रीतील अशाच काही सहाय्यक भूमिकेत दिसणाऱ्या देखण्या अभिनेत्रींबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
अभिनेत्री राधिका विद्यासागर यांनी मराठी इंडस्ट्रीसह हिंदी मालिका सृष्टीतही काम केलं आहे. नायक नायिकेची आई, आत्या, काकू अशा अनेक भूमिकेत त्या झळकल्या आहेत. सध्या स्टार प्लस वरच्या उडने की आशा या मालिकेतून त्या नायकाच्या आईच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळे हिंदी सृष्टीतही राधिका यांना लोकप्रियता मिळत आहे. दिसायला अतिशय सुंदर असणाऱ्या राधिका यांनी त्यांच्या कारकिर्दीत खलनायिकेच्या देखील भूमिका बजावल्या आहेत. पूर्वाश्रमीच्या त्या राधिका हर्षे, फिल्म इंडस्ट्रीतील निरंजन विद्यासागर यांच्याशी त्यांचे लग्न झाले. सई ही त्यांची एकुलती एक लेक.
अभिनेत्री सुलेखा तळवलकर याही देखण्या अभिनेत्रीपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. स्मिता तळवलकर यांची सून ही ओळख मिरवण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या अभिनयाच्या बळावर या इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं आहे. सध्या मुरांबा या मालिकेतून त्या नायकाच्या आईची भूमिका साकारत आहेत. पण केवळ एक अभिनेत्री बनून राहण्यापेक्षा त्यांनी स्वतःची ऍक्टिंग अकॅडमी उभारून नवख्या कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे. याशिवाय युट्युबच्या माध्यमातून त्या सेलिब्रिटींच्या मुलाखती घेत असतात. नुकतेच मुरांबा या मालिकेच्या सेटवर त्यांच्या रिया आणि आर्य या दोन्ही मुलांनी हजेरी लावून मदर्स डे सेलिब्रेट केले होते.
मराठी इंडस्ट्रीतील तिसरी देखणी अभिनेत्री म्हणजे शीतल क्षीरसागर. शीतल क्षीरसागर या सध्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेत काम करत आहेत. सहाय्यक भूमिका , खलनायिका अशा विविध भूमिकेतून त्या प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की शीतल क्षीरसागर या अजूनही अविवाहित आहेत. अर्थात लग्न करण्याची त्यांची इच्छा आहे पण मनासारखा जोडीदार भेटेल आणि या इंडस्ट्रीत काम करताना आपल्याला तो समजून घेईल अशीच त्यांची अपेक्षा आहे.
अभिनेत्री पौर्णिमा गानू म्हणजेच आताच्या पौर्णिमा मनोहर या देखील देखण्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जातात. बालकलाकार ते सहाय्यक भूमिका अशा माध्यमातून त्यांनी काम केलेले आहे. ऋषी मनोहर हा त्यांचा मुलगा. अभिनेता ऋषी मनोहर हा देखील अभिनय क्षेत्रातच करिअर घडवत आहे. तर आजही पौर्णिमा मनोहर ह्या काही नाटकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना पाहायला मिळतात.
अभिनेत्री मंजुषा गोडसे या देखील सहाय्यक भूमिका साकारताना दिसतात. सध्या त्या स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून नायकाच्या आईची भूमिका साकारत आहेत. चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमातून त्यांनी मुशाफिरी केली आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट, असंभव, बायकोच्या नकळतच, मात , भेट अशा कलाकृतीतून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.