काल गुरुवारी १८ एप्रिल रोजी ‘फिल्मफेअर आवर्ड्स मराठी २०२४’ हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला डेझी शाह, नवाजुद्दीन सिद्दीकी सारख्या बॉलिवूड कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती. सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व मराठी कलाकारांनी रेडकार्पेटवर येऊन मीडियाला पोज दिली. गौरी कुलकर्णी, सावनी रवींद्र, महेश कोठारे, किशोरी शहाणे, तेजस्वि प्रकाश, आदिनाथ कोठारे, आसावरी जोशी, बालकलाकार श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर , गश्मीर महाजनी, हार्दिक जोशी, सायली संजीव, रिंकू राजगुरू, प्रियदर्शनी इंदलकर, देवदत्त नागे, आरोह वेलणकर, मीरा जोशी या कलाकारांनी सोहळ्याला उपस्थिती लावून अधिक रंगत आणली होती. १९६४ सालापासून फिल्मफेअर पुरस्कार मराठी या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
पण मध्यंतरी या अशा सोहळ्याकडे मराठी कलाकारांनीच पाठ फिरवल्याने ते बंद करण्यात आले. काही दिवसांपूर्वी उषा नाईक यांनी दिलेल्या मुलाखतीत ‘हा पुरस्कार सोहळा माझ्यामुळे बंद पडला’ असे म्हटले होते. अर्थात त्यांनी ही जबाबदारी गमतीगमतीत घेतली असली तरी अशा सोहळ्याला आमंत्रण देऊनही कलाकार मंडळी हजर होत नव्हती म्हणूनच फिल्मफेअर पुरस्कार मराठी बंद पडला होता. पण २०१५ नंतर हा पुरस्कार सोहळा पुन्हा आयोजित करण्यात येऊ लागला. फिल्मफेअर पुरस्कार सोहळा हा एक मानाचा पुरस्कार सोहळा मानला जातो. या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक असतात. त्याचमुळे या ग्लॅमरसची किनार असलेल्या सोहळ्याला नटून थटून जाण्यासाठी कलाकारांची चढाओढ सुरू असते. बॉलिवूड सृष्टीत अभिनेत्री जशा अंगप्रदर्शन करत या सोहळ्याला हजेरी लावतात तशाच पद्धतिने आता मराठी सृष्टीतील अभिनेत्री देखील त्यांचे अनुकरण करू लागल्या आहेत असेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
काल पार पडलेल्या या सोहळ्यात रिंकू राजगुरू, प्रियदर्शनी इंदलकर, सायली संजीव, हेमल इंगळे यांचा ड्रेस सेन्स पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. रिंकू राजगुरू तिच्या आऊटफिटमुळे स्वतःच कम्फर्टेबल नसल्याचे निदर्शनास आले. त्या खालोखाल हेमल इंगळे देखील तिच्या तोकड्या कपड्यांमुळे ट्रोल झालेली पाहायला मिळाली. प्रियदर्शनी इंदलकर हिलाही यावेळी लोकांनी ट्रोल केले. अंगप्रदर्शन करून काम मिळवण्यासाठी ची ही धडपड आहे पण असे न करता साधं राहूनही तुम्ही तुमच्या टॅलेंटवर काम मिळवू शकता असे नेटकऱ्यांनी त्यांना सुचवले आहे. या सर्व कलाकारांमध्ये मात्र तेजस्वी प्रकाश हिने साडी नेसून आल्याने नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आले.