सारं काही तिच्यासाठी मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा संपन्न… होणारी पत्नी आहे प्रसिद्ध यू ट्युबर
झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील श्रीनू, ओवी, नीरज आणि निशी यांच्या नात्यातील धमालमस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकही तेवढेच उत्सुक असतात. निशीला नीरज मिळाला पण श्रीनूचे लग्न ओवीसोबत कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. श्रीनूचे ओवीसोबत लग्न होईल तेव्हा होईल पण खऱ्या आयुष्यातल्या श्रीनूने त्याच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारासोबत मोठ्या थाटात साखरपुडा केलेला आहे. मालिकेत श्रीनूची भूमिका अभिनेता अभिषेक गावकर याने साकारलेली आहे. डिजिटल क्रिएटर असलेल्या सोनाली सोबत काल त्याने साखरपुडा केला आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अभिषेक गावकर आणि सोनालीने साखरपुडा करून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.
अभिषेक गावकर कॉलेजमध्ये असतानाच नाटकातून काम करत असे. परळ येथी महर्षी दयानंद हे त्याचे कॉलेज. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधुन तो नाटकाचे लेखन ,अभिनय तसेच दिग्दर्शन करू लागला होता. ब्रह्मास्त्र या एकांकिकेने त्याला प्रकाशझोतात आणले होते. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पहिल्या पर्वात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. मालिकेत काम करत असतानाच तो प्रल्हाद कुडतरकला मालिकेचे लिखाण करण्यास साहाय्य करत होता. हंडरेड डेज, माझी माणसं, सुख म्हणजे नक्की काय असतं अशा मालिकांमधुन त्याने विविधांगी भूमिका साकारल्या. सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून अभिषेकला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मालिकेत तो श्रीनिवास सावंत ही भूमिका साकारत आहे. श्रीनू ओवीच्या प्रेमात पडल्याचे दाखवण्यात आले आहे मात्र अभिषेकची खरी ओवी ही रीलस्टार आहे.
अभिषेक रील स्टार असलेल्या सोनाली गुरवच्या प्रेमात आहे हे अगोदरच ततानी जाहीर केले होते. हे दोघेही गेली अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. त्यामुळे हे दोघेही लग्न कधी करणार याची जास्त उत्सुकता होती. काल या दोघांच्या साखरपुड्याला मित्रमंडळी तसेच सहकलाकारांनी देखील हजेरी लावली होती. अभिषेक आणि त्याच्या मित्रांनी वेगवेगळ्या गाण्यांवर ठेका धरत सोहळ्याला रंगत आणली होती. अभिनेता अभिषेक गावकर आणि यु ट्युबर सोनाली गुरव यांना साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा.