‘स्थळ पुणे’ म्हटलं की पुणेरी पाट्या आणि पुणेकरांची टोमणे मारण्याची खास शैली सातासमुद्रापार प्रचलित आहे. अशाच पुणेकरांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न ‘स्थळ पुणे’मधून काही तरुणांनी घेतला आहे. पुणेकरांच्या शैलीत मजेशीर व्हिडीओ बनवून ही तरुणाई आज त्यांच्या लाखो फॉलोअर्सना हसवत आहे. अथर्व सुदामे आणि डॅनी पंडित हे दोन तरुण आपल्या विशिष्ट शैलीतून मजेशीर व्हिडीओ बनवतात आणि या छोट्या छोट्या व्हिडीओतून ते प्रेक्षकांना लोटपोट हसवतात. त्याचमुळे डिजिटल क्रिएटर असलेल्या अथर्व सुदामेच्या व्हिडिओला सोशल मीडियावर लाखो लोकांची पसंती मिळत असते. अथर्व सुदामेला नवनवीन व्हडिओज बनवण्याची भारी हौस होती. लहान असल्यापासूनच तो असे व्हिडीओ बनवत होता. इन्स्टाग्राम आणि युट्युबमुळे त्याला ही कला सादर करण्याचा एक हक्काचा प्लॅटफॉर्म मिळाला. स्किट लिहून त्याचे सादरीकरण कसे करावे याकडे त्याचा जास्त कल असतो.
अगदी साधा दुकानदार , प्रसिद्ध वैशाली हॉटेल ते गजबजलेल्या एफसी रोडवर देखील त्यांनी भन्नाट रिल्स बनवले आहेत. रोजच्या जीवनात असे अनुभव घेतलेल्याना त्यांचे हे रिल्स खूप भावतात. त्याचमुळे त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अथर्वचे इन्स्टाग्रामवर १.४ मिलीयन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत. मराठी सृष्टीतील मोठमोठ्या सेलिब्रिटींना देखील त्याच्या या वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओजची भुरळ पडलेली आहे. हे व्हिडीओज बनवण्यासाठी त्याने कधी कोणाची मदत घेतली नाही. कारण स्वतःच्या टॅलेंटवर त्याला मोठा विश्वास होता. सोशल मीडिया स्टार, मॉडेल अशी त्याने एक वेगळी ओळख मिळवली आहे. काही ब्रॅण्डसाठी त्याने त्याच्या खास शैलीत जाहिराती देखील केल्या आहेत. ही प्रसिद्धी त्याला एका दिवसात मिळाली नाही तर त्यामागे त्याची अपार मेहनत होती. राज ठाकरे यांनी अथर्व सुदामेच्या क्रिएटिव्हिटीचे नेहमीच कौतुक केले आहे. कुठल्याही ब्रॅंडची जाहिरात असो किंवा चित्रपट, मनोरंजन विश्वातल्या प्रमोशनसाठी निर्माते अथर्व सुदामे कडे धाव घेत असतात. या माध्यमातून अथर्व चांगली कमाई करतो आहे. महिन्याला जवळपास ६ ते ७ लाखांची रक्कम तो यातून कमवत आहे. इतकंच नाही तर काही ब्रॅण्ड्स हॉटेल्सच्या जाहिराती करूनही तो बक्कळ पैसे कमावतो.
आयपीएलच्या प्रमोशनसाठी सुदामेने चक्क ब्रेट ली, रॉबिन उत्थपा, क्रिस गिल, सुरेश रैना, एबीडी विल्यर्स या स्टार क्रिकेटर्स सोबत वेळ घाकवला होता. सोशल मीडियावर प्रेक्षक चांगल्या वाईट अशा दोन्ही प्रतिक्रिया देत असतात. हा अनुभव अथर्वने देखील घेतलेला आहे. चाहत्यांच्या चांगल्या, वाईट प्रतिक्रिया नेहमीच प्रेरणा देतात असे तो याबद्दल म्हणतो. मात्र यातून अधिक चांगला कंटेंट कसा बनवायचा यासाठी तो प्रयत्नशील असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमावता येतात म्हणून आजकाल या क्षेत्राकडे सर्वांचा कल वाढला आहे, मात्र हे ध्येय्य साधण्यासाठी त्याची मेहनत देखील तेवढीच महत्वाची आहे हे विसरून चालणार नाही. नुकताच अथर्व सुदामे ह्याला झी युवा डिजिटल कला सन्मान (अतरंगी कलाकार) हा सन्मान देखील देण्यात आला.