ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे नुकतेच निधन झाले आहे. दिनेश बलसावर हे शुभा खोटे यांच्या पतीचे नाव आहे. ६० वर्षांच्या सहवासानंतर आज पतीने आयुष्याच्या प्रवासात ही सोडलेली साथ पाहून शुभा खोटे भावुक झाल्या आहेत. “६० वर्षे आम्ही एकमेकांना सांगितले, की “सोबत म्हातारे होऊ. सर्वोत्तम जीवन जगू ” अलविदा, सोबती”…असे म्हणत शुभा खोटे यांनी पतीच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. १९६४ साली शुभा खोटे या दिनेश बलसावर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या होत्या. दिनेश बलसावर हे निर्माते होते. १९६७ सालच्या ‘चिमुकला पाहुणा’ या मराठी चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली होती.
तर शुभा खोटे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. विजू खोटे आणि शुभा खोटे या दोन्ही बहीण भावंडाने या चित्रपटात एकत्रित काम केले होते. भावना बलसावर आणि अश्विन बलसावर अशी त्यांना दोन अपत्ये आहेत. भावना बलसावर ही हिंदी मालिका अभिनेत्री आहे. तर अश्विन बलसावर हा संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. शुभा खोटे यांचे वडील मुकपटात काम करत असत. यातूनच विजू आणि शुभा खोटे यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. शुभा खोटे या उत्तम सायकल चालवायच्या तसेच त्या स्विमिंग चॅम्पियन म्हणूनही ओळखल्या जात होत्या.
राष्ट्रीय स्तरावर त्यांनी स्पर्धा खेळल्या होत्या. काही दिवसांपूर्वी शुभा खोटे यांनी स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले होते. दुर्गा आत्याची अतरंगी भूमिका त्यांनी या वयात देखील सुरेख निभावलेली पाहायला मिळाली होती. त्यात आता नवऱ्याच्या निधनाने शुभा खोटे खचलेल्या आहेत. नवऱ्यासोबतचा त्यांचा ६० वर्षांचा सुखी संसार आज कोलमडून पडला आहे. या दुःखातून शुभा खोटे यांना सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.