लागीरं झालं जी या झी मराठीवरील मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयाने ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. आज या मालिकेचे कलाकार कुठल्या ना कुठल्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातील तुम्हाला टॅलेंटचे पात्र नक्कीच आठवणीत असेल. भय्यासाहेबचा उजवा हात मानणाऱ्या या टॅलेंटचे त्याच्या शारीरिक उंचीपेक्षा अभिनयाची उंची गाठलेली पाहायला मिळाली. या मालिकेनंतर तो कारभारी लयभारी, चला हवा येऊ द्या मध्ये झळकला होता. मात्र आता हाच टॅलेंट व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झालेला आहे. टॅलेंट म्हणजेच अभिनेता महेश जाधव हा मूळचा साताऱ्यातील फलटणचा.
आता अभिनय क्षेत्राच्या जोडीलाच महेशने स्वतःचा फूड ट्रक सुरू करून व्यवसाय क्षेत्राची वाट धरली आहे. यात त्याला त्याचा खास मित्र अन्वर शेख याचीही साथ मिळाली आहे. “Hello Shwarma” या नावाने त्याने खाद्यपदार्थ विक्री व्यवसाय सुरू केला आहे. शॉरमा हा लेबनिज खाद्यपदार्थ आहे. हळूहळू भारतात या खाद्यपदार्थाची लोकप्रियता वाढू लागली आहे. याच हेतुने फलटण शहरातील खवय्यांना हा पदार्थ चाखता यावा या हेतूने महेशने या व्यवसायात उतरण्याचे धाडस दाखवले आहे. हॅलो शॉरमा या नावाने त्याने फूड ट्रक सुरू केला असून त्यावर महेशचा फोटो देखील छापण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी डी एड चौक फलटण येथे त्याने या फूडट्रकचे उद्घाटन केले.
इंडस्ट्रीतील त्याच्या जवळच्या मित्रांनी या फूड ट्रकला आवर्जून भेट दिलेली पाहायला मिळते आहे. सोबतच महेशला या व्यवसायानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत. चित्रपट, मालिका असा महेशचा प्रवास सुरूच आहे पण भविष्याचा विचार करता त्याने त्याचे पैसे योग्य जागी गुंतवले आहेत हे पाहूनच त्याचे मोठे कौतुक केले जात आहे. अभिनय क्षेत्र बेभरवशाचे असल्याने तुम्हाला भविष्या ची तडजोड करून ठेवणे गरजेचे असते हे गमक ओळखून महेशने या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी इंडस्ट्री आता पर्यायी उद्योगांना पसंती देऊ लागले आहेत. कोणी हॉटेल व्यवसाय तर कोणी कपड्यांचा ब्रँड सुरू करत आहेत. हा बदल घडून येणे खूप गरजेचे होते असेच आता यातून स्पष्ट होत आहे. तूर्तास महेश जाधव ह्याच्या व्यवसाय क्षेत्रातील पदार्पणास आमच्या टीमकडून शुभेच्छा.