फक्त ७० कोटी बजेटच्या चित्रपटाने २ दिवसात घातला धुमाकूळ इतक्या कोटींची केली कमाई … प्रेक्षकांची रात्री १२ च्या शोची मागणी
ह्या आठवड्यात रिलीज झालेल्या चित्रपटांपैकी शैतान या बॉलीवूड चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शैतान या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या समोर आला तेव्हा आगळेवेगळे कथानक पाहून अनेकांनी चित्रपट पाहण्याची उत्सुकता दाखवली. अजय देवगण, ज्योतिका आणि आर माधवन यासारख्या तगड्या कलाकारांना चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. एका फार्महाऊसमध्ये चित्रपटाचे कथानक दडलेले आहे. आर माधवन प्रथमच एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आला आहे. हळूहळू पुढे सारकणारे भयभीत करणारे कथानक क्षणोक्षणी तुमची उत्कंठा वाढवण्याचा प्रयत्न करतो. शैतान हा वाश नावाच्या गाजलेल्या गुजराती चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे बोलले जाते. जिओ स्टुडिओ प्रस्तुत, अजय देवगण फिल्म्स आणि पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल मार्फत चित्रपटाला देवी श्री प्रसाद यांनी संगीत दिले आहे.
ऍनिमल चित्रपटापासून बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट करण्याचे प्रमाण थोड्या प्रमाणात कमी झालेले आहे. शैतान चित्रपटाचा टिझर पाहूनच लोक आर माधवनसाठी थिएटरमध्ये गर्दी करू लागले आहेत . ८ मार्च रोजी शैतान चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्याच दीवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर तब्बल १४.७५ कोटींचा गल्ला जमवला. काल शनिवारी चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळालेला पाहून मध्यरात्री शो लवण्यात यावा अशी प्रेक्षकांनी मागणी केली. प्रेक्षकांच्या इच्छेखातर मुंबईत रात्री ११.५५ वाजता मध्यरात्रीचा शो लावण्यात आला. चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा केलेला पाहायला मिळाला. काल मिळालेला प्रतिसाद पाहून आज रविवारी देखील लोक शैतान पाहायला गर्दी करत आहेत. काल चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करून दोन दिवसात हा आकडा ३३ कोटींवर नेऊन पोहचवला आहे.
तर आज सकाळच्या शोमध्ये चित्रपटाने २ कोटींचा गल्ला जमवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एका आठवड्यात हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा नक्कीच गाठेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आजही शैतानला पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत असेच चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आर माधवनच्या अभिनयाचं मोठं कौतुक केलं जात आहे. अजय देवगण आणि ज्योतिका यांच्या मुलीला हा शैतान वश करतो आणि त्याला हवं ते तो तिच्याकडून करून घेतो. तरुणीचे आईवडील या संकटाला कसे सामोरे जातात अशा आशयाचा हा चित्रपट असल्याने एक वेगळे कथानक पाहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळत आहे. या चित्रपटासाठी अजय देवगणने २५ कोटी घेतले आहेत हा चित्रपट बनवण्यासाठी जवळपास ७० कोटींचा खर्च झाला असे म्हटले जात आहे.