मुंबईच्या ठिकाणी प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं फार्महाऊस….पर्यटकांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
मराठी सृष्टीतील बरेचसे कलाकार मंडळी अर्थार्जनासाठी आता पर्यायी मार्गांचा शोध घेऊ लागले आहेत. अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचे असते, इथे तुम्हाला आयुष्यभर काम मिळेल याची शाश्वती मिळत नाही. त्यामुळे आहे त्या प्रसिद्धीचा फायदा करून मिळालेला पैसा योग्य जागी गुंतवावा अशी विचारसरणी आचरणात आणली जात आहे. आपण पाहतो की मराठीसह बॉलिवूड सृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहरे त्यांच्या उतारवयात केवळ पैसा जवळ नसल्याने हतबल होतात. अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी भविष्याची तरतूद करून ठेवावी लागते. याचाच विचार करून प्राजक्ता माळी, मेघा धाडे यांनी त्यांचे फार्महाऊस भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रदीप कबरे यांनीही त्यांचे फार्महाऊस पर्यटकांसाठी खुले केलेले आहे. नुकतेच प्रदीप कबरे यांनी त्यांच्या फार्म हाऊसची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
निसर्गाच्या सानिध्यात असलेलं त्यांचं हे फार्महाऊस आता त्यांनी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, बोरिवली येथील मनोरी या गावात त्यांचं हे फार्महाऊस बांधलेलं आहे. एकाचवेळी दहा ते बारा व्यक्ती या फार्महाऊसमध्ये राहू शकतील अशी या फार्महाऊसची रचना करण्यात आली आहे. स्विमिंगपूल , जेवणाची आणि राहण्याची उत्तम सोय इथे करून देण्यात आली आहे. प्रदीप कबरे स्वतः विकेंडला त्यांच्या कुटुंबासोबत या फार्महाऊसला भेट देत असतात. हिरवीगार झाडी, स्विमिंगपुल, चुलीवरचं जेवण असा त्यांचा विकेंडचा मस्त बेत आखलेला असतो. मुंबईच्या गर्दीपासून दूर राहून निवांत वेळ घालवता यावा म्हणून त्यांनी मनोरी या गावात फार्महाऊस खरेदी केलं होतं. मुंबईत त्यांचा स्वतःचा एक मोठा फ्लॅट देखील आहे इथे ते पत्नी, आई वडील, मुली यांच्यासोबत राहतात.
मराठी चित्रपट, मालिका तसेच नाट्य क्षेत्रात प्रदीप कबरे यांनी केवळ अभिनेते म्हणूनच नाही तर दिग्दर्शक म्हणूनही भूमिका पार पाडली आहे. दिल धक धक करे, कोंडी, दैव देते, पछाडलेला, नवरा माझा नवसाचा, ईचार ठरला पक्का, मुंबईचा डबेवाला, लालबागचा राजा अशा अनेक गाजलेल्या चित्रपट, मालिका, नाटकातून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर काही नाटकांचे त्यांनी दिग्दर्शनसुद्धा केले आहे. अभिनय, दिग्दर्शन क्षेत्रातील या प्रवासात त्यांनी मोठं यश संपादन करत मिळालेला पैसा योग्य जागी गुंतवला आहे. अर्थार्जनासाठीचा आणखी एक पर्याय म्हणून त्यांनी आता हे फार्महाऊस भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदीप कबरे यांचं हे फार्महाऊस मुंबईच्या अगदी जवळच असल्याने रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा निवांत वेळ काढून राहण्यासाठी हे फार्महाऊस उत्तम आहे. तेव्हा तुम्हाला जर प्रदीप कबरे यांच्या फार्महाऊसला भेट द्यायची असेल तर त्यांच्याशी नक्कीच संपर्क साधा.