आलो तर तुझा गेलो तर समाजाचा….ही अभिनेत्री साकारणार जरांगे पाटील यांच्या पत्नीची भूमिका ट्रेलर झाला लाँच
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यांच्या याच संघर्षाची गाथा चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. येत्या २६ एप्रिल रोजी ‘ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सोनाई फिल्म क्रिएशन्स प्रस्तुत गोवर्धन दोलताडे लिखित आणि निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली, सराटी येथे चित्रपटाचे शूटिंग पार पडले आहे. या चित्रपटात मनोज जरांगे यांची भूमिका रोहन पाटील यांनी साकारली आहे. रोहन पाटील यांनी याअगोदर धुमस, मुसंडी , मजनू अशा चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. आज या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
त्यात जरांगे पाटील यांचा एक डायलॉग चांगलाच प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे. ” मी बायकोला सांगतानाच सांगितलंय की हे बघ, आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा , कुंकू पुसून तयार रहा” असे मनोज जरांगे त्यांच्या पत्नीला म्हणतात असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मनोज जरांगे यांच्या पत्नी सुमित्राच्या भूमिकेत अभिनेत्री सुरभी हांडे झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सुरभी हांडे बऱ्याच प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. जय मल्हार मालिकेमुळे सुरभीला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. आंबट गोड, लक्ष्मी सदैव मंगलम, अगबाई अरेच्चा २ , गाथा नवनाथांची अशा कलाकृतीतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मधल्या काळात सुरभीकडे चांगले प्रोजेक्ट येत नव्हते. त्यानंतर गाथा नवनाथांची मालिकेत तिला एक महत्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
त्यानंतर आता ती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे. त्यांच्या या संघर्षमय प्रवासात पत्नीची त्यांना मोठी साथ मिळाली आहे. एक पत्नी म्हणून सुमित्रा पाटील यांचे भावविश्व नेमजे कसे आहे हे सुरभीने तिच्या अभिनयातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेता संदीप पाठक, अरबाज शेख, सागर कारंडे, मोहन जोशी, माधवी जुवेकर, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौघुले या कळकरांचीही त्यांना साथ मिळाली आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक देखील तेवढेच उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत.