दूरदर्शन वर “मालगुडी डेज” ही मालिका प्रसारित होत होती. ९० च्या दशकातील या मालिकेचे जवळपास ३९ भाग प्रदर्शित झाले होते. प्रसिद्ध आर के लक्ष्मण यांनी या मालिकेचा कार्यभार सांभाळला होता. या मालिकेचे शीर्षक गितही बहुतेकांना आठवत असावे. मालिकेला आणि शीर्षक गीताला भरपूर पसंती देखील मिळाली होती. याच मालिकेचे सोनी वाहिनीवर पुनःप्रसारण देखील करण्यात आले होते. मालिकेत स्वामी अँड फ्रेंड्स भागातील “स्वामी ” नावाचा मुलगा विशेष लक्षणीय ठरला होता. त्यामुळे तो सध्या काय करतो? त्याचे मित्र काय करतात? ते सध्या कसे दिसतात? कोठे राहतात? याची विचारणा सर्वच स्तरातून होताना दिसली. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरू लागला.
मालिकेतील “स्वामी ” ची भूमिका मंजुनाथ नायकर याने साकारली आहे. २३ डिसेंबर १९७६ साली त्याचा कर्नाटक येथे जन्म झाला. अमिताभ बच्चनच्या “अग्निपथ” या चित्रपटात देखील त्याने त्यांच्या लहानपणीची भूमिका साकारलेली आहे. तसेच अनेक दाक्षिणात्य चित्रपटात देखील तो पाहायला मिळाला. त्याने बंगलोर युनिव्हर्सिटी मधून सामाजिक शास्त्रातून एम ए चे शिक्षण पूर्ण केले आहे. आता तो या क्षेत्रात सिनेमॅटोग्राफर म्हणून कार्यरत आहे. मंजुनाथ याची स्वतःची कंपनी आहे. मंजुनाथचे लग्न झाले असून पत्नी स्वर्णलेखा या ऍथलेट प्लेअर आहेत. स्प्रिंटर आणि लॉंग जम्प मध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. मंजुनाथ आणि स्वर्णलेखा नायकर यांना एक मुलगाही आहे.
मालगुडी डेज मधील राजम हे पात्र खूपच प्रसिद्धीच्या झोतात आलं होत. राजम हे पात्र अभिनेता रोहित श्रीनाथ याने साकारलं होत. मालगुडी डेज मालिकेनंतर त्याने आणखीन काही मालिकांत देखील काम केलं. गरुड रेखे, बेलिनागा, अग्नाथवास अशी त्याने अभिनित केलेले चित्रपट देखील गाजलेले पाहायला मिळाले. पण मोठा झाल्यावर 2000 मध्ये त्याने सॉफ्टवेअर फर्मसाठी नेटवर्क प्रशासक म्हणून काम करणे निवडले. त्यानंतर, त्याने 2007 मध्ये स्वतःची कंपनी सुरू केली त्यानंतर त्याने मागे वळून न पाहता स्वतःच्या व्यवसाय वाढवण्यात व्यस्त राहिला. आज तो तब्बल ५ कंपनीचा मालक आहे.
मालगुडी डेज मधील आणखीन एक प्रसिद्ध पात्र म्हणजे स्वामीचा जीवलग गरीब मित्र “मणी”. मणी हे पात्र अभिनेता रघुराम सीताराम ह्याने साकारलं होत. “रिश्तों की डोरी” ह्या हिंदी मालिकेत त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. पुढे त्याने देखील अभिनय क्षेत्राला रामराम ठोकून इंटरनेटच्या युगात पाऊल टाकलं. मालिकेत अतिशय मठ्ठ दाखवलेला आणि प्रत्येकवेळी भांडणे करणारा मणी हा खऱ्या आयुष्यात अत्यंत हुशार आणि शांत मुलगा होता. परदेशात जाऊन मोठं व्हायचं स्वप्न त्याने वास्तवात उतरवलं आहे. आज तो कॅनडामध्ये टोरांटो या शहरात राहत असून एका नामांकित कंपनीसाठी काम करताना पाहायला मिळतो.