प्रसिद्ध ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे आज सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी प्रदीर्घ आजाराने ७२ व्या वर्षी निधन झाले आहे. अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी आज सोशल मीडियावर जाहीर केली आहे. “अत्यंत जड अंत:करणाने, 26 फेब्रुवारी रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाल्याची माहिती देताना आम्हाला दुःख होत आहे. उधास कुटुंबीय.” असे म्हणत त्यांच्या मुलीने ही दुःखद बातमी शेअर केली आहे. पंकज उधास यांचे आज सकाळी ११ वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. यादरम्यान पंकजजी कोणालाही भेटत नव्हते. उद्या मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंकज उधास यांची मुलगी नायब हिने ही वडिलांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
भावपूर्ण गझलांचा गायक अशी ओळख असलेले पंकज उधास यांनी चार दशकांहून अधिक काळ श्रोत्यांना त्यांच्या गायकीने मंत्रमुग्ध केले आहे. १७ मे १९५१ रोजी गुजरातमधील जेतपूर येथे जन्मलेल्या उधास यांचा संगीत प्रवास लहान वयातच सुरू झाला होता. त्याचे पालनपोषण संगीतमय वातावरणातच झाले होते. त्यांचा मोठा भाऊ मनहर उधास आधीच बॉलीवूडमधील एक यशस्वी पार्श्वगायक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्याच मार्फत पंकज यांचाही संगीताच्या जगातात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. सुरुवातीच्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी गीतं गायली होती. १९८० मध्ये त्यांनी त्यांचा पहिला गझल अल्बम “आहट” रिलीज केला होता. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार, गझल गायनासाठी, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि भारताचा चौथा-सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पंकज उधास यांचा आवाज सर्वत्र गझलप्रेमींच्या हृदयात कायमचा कोरला गेला आहे. त्यांच्या अशा अचानक निधनाच्या बातमीने मात्र सर्वत्र शोककळा पसरली आहे. चांदी जैसा रंग है तेरा, चिठ्ठी आई है आई है, आज फार तुमपे प्यार, ना कजरे की धार अशी अनेक गीतं त्यांनी त्यांच्या गायकीने अजरामर केली आहेत. पंकज उधास यांच्या पश्चात पत्नी फरीदा उधास आणि रेवा, नयाब अशा दोन मुली आहेत.
अनेकांना हे माहित नसेल कि गायक पंकज उधास हे घोड्यांच्या रेसचे शौकीन होते. अनेक वर्ष त्यांच्या नावाने पुणे आणि मुंबई रेसमध्ये घोडे देखील होते आणि बऱ्याच रेस ते जिंकले देखील आहेत. हॉर्स ट्रेनर मगनसिंग जोधा आणि अधिराज सिंग जोधा यांच्याकडे पंकज उदास यांचे काही घोडे देखील होते ते घोड्यांच्या शर्यतीत भाग घायचे. पण कालांतराने मगनसिंग जोधा यांच्या निधनानंतर पंकज उधास यांनी घोड्याच्या रेसमधून माघार घेतली. अनेक वर्ष ते मुंबई आणि पुणे रेस कोर्से चे सभासद देखील होते. गाण्यासोबत हा त्यांचा छंद अनेकांना माहित नसावा पण जुने जाणकार लोकांना हे नक्कीच माहित असेल कि अनेक बॉलीवूड कलाकार हे घोड्यांच्या शर्यती पाहायला नक्की जायचे. आजही अनेक कलाकार डर्बी आणि इव्हिटेशन कप च्या वेळी आवर्जून हजेरी लावतात.