राजकारणी व्यक्ती चित्रपटात येणं हे काही नवीन नाही. कारण याअगोदर देखील छगन भुजबळ सारख्या राजकारण्यांनी चित्रपटात अभिनयाचा अनुभव घेतलेला आहे. छोट्या छोट्या भूमिकेतून ही नेते मंडळी आपल्या अभिनयाची हौस पूर्ण करून घेताना दिसली आहेत. मात्र आता प्रथमच एका महत्वपूर्ण भूमिकेत संभाजीराजे छत्रपती चित्रपटातून झळकताना दिसणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात ते सदस्य म्हणून आहेत. राजकारणाची धुरा समर्थपणे सांभाळत असतानाच संभाजीराजे छत्रपती यांना चित्रपटाची ऑफर आली आहे. लवकरच नागराज मंजुळे यांचा ‘खाशाबा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्यांचेच आजोबा शहाजी महाराज यांची भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळालेली आहे.
नागराज मंजुळे यांच्या विनंतीवरून ही भूमिका ते स्वीकारणार असल्याचे सांगितले जाते. याबद्दल संभाजीराजे छत्रपती सांगतात की, ” माझा चेहरापट्टी, आवाज, माझं नाक याबाबत आमचे आजोबा शहाजी महाराज आणि माझ्यात खूप साम्य असल्याचं नागराज मंजुळे यांना जाणवलं. त्यामुळे मी शहाजी महाराजांची भूमिका करण्याचे स्वीकारले आहे.” असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान खाशाबा हा चित्रपट खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित असल्याचे नागराज मंजुळे यांनी जाहीर केले होते. गेल्या वर्षी या चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आले होते. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि आटपाट निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः नागराज मंजुळे करणार आहेत. नागराज मंजुळे, त्यांची पत्नी गार्गी कुलकर्णी, ज्योती देशपांडे हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात नवख्या कलाकारांची ऑडिशन घेण्यात आली होती.
दरम्यान चित्रपटाचे बरेचसे शूटिंग झाले असून अजून काही महत्वाच्या घटना चित्रित करणे बाकी आहे. त्यात आता शहाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार यावर विचार चालू होते. तेव्हा ही भूमिका त्यांचाच नातू संभाजीराजे छत्रपती यांनी साकारावी असा प्रस्ताव नागराज मंजुळे यांनी त्यांच्यापुढे मांडला. या भूमिकेसाठी तुम्हीच योग्य आहात असे सुचवल्यानंतर संभाजीराजे छत्रपती चित्रपटात काम करायला तयार झाले. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती आता अभिनय क्षेत्रात प्रथमच झळकणार आहेत. प्रेक्षकांनीही त्यांच्या या निर्णयाचे स्वागतच केलेले पाहायला मिळत आहे.