आपल्याच दोघांना चित्रपटात कामं मिळतील….रंजनाने दिलेल्या या सल्ल्याला रविंद्र महाजनी यांचा होता विरोध
रविंद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात अनेक चांगल्या, वाईट घटनांचा मागोवा घेतलेला आहे. रविंद्र महाजनी यांचा प्रेमभंग झाल्यामुळेच ते वाईट मार्गाला लागले होते हे त्या आत्मचित्रात लिहिले आहे. पण चित्रपटातून जसजसे त्यांना काम मिळत गेले तसतसे त्यांनी जुगार खेळणे बंद केले होते. खरं तर रविंद्र महाजनी चित्रपटातून काम करत असताना जेवढे पैसे कमवायचे ते सगळे पैसे पत्नी माधविकडे आणून द्यायचे. झुंज चित्रपटानंतर त्यांना मराठीतील आघाडीचा नायक म्हणून ओळख मिळाली होती. त्यामुळे जुगारापेक्षा त्यांना आता लोकप्रियतेचे व्यसन जडले होते. कित्येक वर्षे तर ते मुलीचा वाढदिवस एखाद्या लग्नासारखा साजरा करायचे. चित्रपटाच्या व्यस्त शेड्युलमधून जेव्हा ते घरी यायचे तेव्हा ते माधवी सोबत भरपूर गप्पा मारत वेळ घालवायचे.
मुलांना, बायकोला, नातेवाईकांना सगळ्यांवर ते मनसोक्त खर्च करायचे. रविंद्र महाजनी यांच्या व्यसनाचा भाग सोडला तर ते दिलखुलास व्यक्तिमत्त्व होतं. एवढा देखणा नायक असूनही चित्रपटात सुंदर नायीकांसोबत काम करताना त्यांचे पाऊल चुकीच्या मार्गाने पडले नाही. सुंदर सुंदर मुलींचा गराडा त्यांच्याभोवती सतत असायचा पण त्यांच्या पासून ते चार हात लांब असायचे. रंजना आणि रविंद्र महाजनी यांची जोडी मोठ्या पडद्यावर तुफान गाजलेली पाहायला मिळाली. या जोडीने अनेक चित्रपटात एकत्रित काम केले. ‘जाणता अजाणता’ हे रविंद्र महाजनी यांचे पहिले नाटक खूप गाजले होते. व्ही शांताराम त्यावेळी झुंज चित्रपटासाठी तगड्या नायकाच्या शोधात होते. हे नाटक पाहिल्यानंतर त्यांना रविंद्र महाजनीच चित्रपटासाठी योग्य आहेत असे वाटले. यात त्यांची नायिका होती रंजना . ‘कोण होतास तू…’ , ‘निसर्ग राजा ऐक सांगते…’ ही चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. या भूमिकेसाठी रविंद्र महाजनी यांना फिल्म फेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. लक्ष्मी , मुंबईचा फौजदार चित्रपटाने ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसली. गोंधळात गोंधळ या चित्रपटात रंजना असली तरी प्रिया तेंडुलकर सोबत रविंद्र महाजनी यांना संधी मिळाली होती. रविंद्र महाजनी आणि रंजना ही जोडी सुपरहिट झाल्यानंतर या दोघांना अनेक चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या.
आपल्याला आणखी चित्रपटात काम करता यावे म्हणून रंजनाने रविंद्र महाजनी यांना एक उपाय सुचवला होता. माधविला विश्वासात घेऊन ‘आपल्या दोघांचं अफेअर चाललंय असं आपण उठवूया…’ असा रंजनाने एक मार्ग सुचवला होता. माधवी यांनी आपली काहीच हरकत नाही म्हणून या गोष्टीला होकार कळवला होता. पण रविंद्र महाजनी यांनी मात्र याला स्पष्टपणे नकार दिला होता. रविंद्र महाजनी हे कामाच्या बाबतीत आणि पत्नीच्या बाबतीत एकनिष्ठ होते. त्यांच्यासोबत काम करणारी एक नायिका त्यांच्या प्रेमात पडली होती . तेव्हा ती नायिका थेट रविंद्र महाजनी यांच्या घरी पोहोचली होती. पण रविंद्र महाजनी परक्या स्रियांपासून खूप लांब राहत होते. ती इथे का आली किंवा तिला माझा पत्ता कसा कळला हेही ते पत्नीला बोलून दाखवत असत. त्यामुळे रविंद्र महाजनी यांची ही बाजू जमेची ठरली होती. एवढा देखणा नायक असूनही ते आपल्या पत्नीशी कायम एकनिष्ठ राहिले हे माधवी महाजनी यांच्या आत्मचरित्रातून स्पष्ट होते. त्याचमुळे रंजनाने सुचवलेल्या पर्यायाला त्यांनी थेट नकारच दिलेला पाहायला मिळाला.