रविंद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी “चौथा अंक” हे आत्मचरित्र प्रकाशित केलं आहे. त्याला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या पुस्तकात नेमकं काय वाचायला मिळणार हे जाणून घेण्याची सर्वानाच उत्सुकता आहे. याच पुस्तकात माधवी महाजनी यांनी त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. रविंद्र महाजनी यांच्याशी त्यांची पहिली भेट कुठे झाली याबद्दल त्यांनी सविस्तर लिहिलं आहे. माधवी महाजनी या पूर्वाश्रमीच्या माधवी मोटे. तीन बहिणी आई वडील असे त्यांचे कुटुंब. पणजोबा सावकार असल्याने घरी पैसे, सोनं नाणं भरपूर होतं. अगदी वडिलांचे निधन झाल्यानंतरही पैशांची अडचण भासली नाही. माधवी महाजनी आठवीत शिकत असतानाच वडिलांचे निधन झाले होते. दादरची किंग जॉर्ज (गर्ल्स स्कुल) ही त्यांची शाळा.
दहावीत असताना शाळेच्या खिडकीतून त्यांना एक देखणा तरुण रस्त्याने जाताना दिसायचा. तो कधी दिसेल म्हणून त्या वर्गातल्या बाकावर बसून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसायच्या. त्याचं एकदा दर्शन झालं की त्या दिवशी त्या खूप खुश असायच्या आणि दिसला नाही की दिवस फुकट गेला असं वाटायचं. त्याच्या जाण्यायेण्याची वेळ त्या लक्षात ठेवायच्या. ओळख होण्याआधीच त्या त्याच्या प्रेमात पडल्या होत्या. शाळेतून घरी आल्यानंतर माधवी मैत्रिणींसोबत फिरायला जायच्या. तिथेच काही मुलंही फिरायला यायची. त्यांच्यासोबत सगळ्यांची छान ओळख झाली होती. त्याच मुलांतील एकाजणाबरोबर त्यांनी रवीला पाहिलं. त्याचं नाव रविंद्र होतं हे कुठूनतरी कळलं. तेव्हा हाच धागा पकडून ‘रवी तुमचा मित्र का? त्यांच्याशी ओळख करून द्या ना’. असं माधवी यांनी त्या मित्राला सांगितलं. ‘असंच एक दिवस तो मित्र रवीला घेऊन आला.
मित्राने रवीशी ओळख करून दिल्यानंतर रवीने माझ्याशी शेक हॅन्ड केला.’ ही होती रविंद्र महाजनी आणि माधवी यांची पहिली भेट. त्यानंतर नाक्यावर अनेकदा त्यांची भेट होऊ लागली. सुधा ही माधवी यांची मैत्रीण. रवीची आणि आपल्या मैत्रिणीची ओळख करून द्यावी म्हणून तिला त्या घेऊन नाक्यावर गेल्या. तेव्हा पहिल्याच भेटीत रवीने सुधाकडे ‘ दोन रुपये देतेस? मी जरा सिगरेट घेऊन येतो.’ असे म्हणताच माधवी आणि सुधा दोघीही अवाक झाल्या.’ कसला हा माणूस पहिल्याच भेटीत मला पैसे मागतो ‘ म्हणत सुधाने मधवीला त्याच्यापासून लांब राहायला सांगितले.