लागीरं झालं जी या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला किरण गायकवाड ह्याने नुकताच एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये समोर असलेल्या मुलीला तो गुलाबांच्या फुलांचा गुच्छ देताना दिसत आहे. “ए फेब्रुवारी आहे आतातरी फायनली आपण सगळ्यांना सांगूयात का” असे म्हणत त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले असल्याचे या फोटोवरून दिसून येते. आता किरण गायकवाडच्या या फोटोवर सगळ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करत त्याची गर्लफ्रेंड कोण आहे याचे तर्क लावले आहेत. पण ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून देवमाणूस फेम डिंपल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख आहे हे त्यानेच कॅप्शनमध्ये जाहीर केले आहे.
अस्मिता देशमुख आणि किरण गायकवाड दोघेही देवमाणूस आणि देवमाणूस २ या मालिकेत एकत्रित काम करताना दिसले. त्यामुळे त्यांच्या या फोटोवरून हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत असे त्यांनी जाहीर केले आहे. या फोटोवर मोनालीसा बागल हिनेही अभिनंदन अशी प्रतिक्रिया दिली आहे. पण या फोटोबाबत अनेकांना संभ्रम निर्माण झाला आहे. किरण गायकवाड आणि अस्मिता देशमुख हे दोघे मालिकेनंतर कधीही एकत्र पाहायला मिळाले नाहीत. त्यामुळे या फोटोमागे दुसरेच काहीतरी गुपित आहे असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. देवमाणूस मालिकेनंतर अस्मिता देशमुख सन मराठीवरील ‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेतून प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. तर किरण गायकवाड फौज या आगामी चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र आज १ फेब्रुवारीचे औचित्य साधून किरणने अस्मिताला प्रेमाची जाहीर कबुली दिलेली पाहायला मिळत आहे.
या फोटोवरून त्यांनी नक्कीच त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तूर्तास हे दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात आहेत की कुठल्या आगामी प्रोजेक्टची त्यांनी यातून हिंट दिली आहे हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. दरम्यान अस्मिताची बहीण ज्ञानेश्वरी देशमुख हिनेही त्यांच्या या फोटोला ‘love birds’ असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे या फोटोमागचे गूढ अधिकच वाढत चालले आहे. अस्मिता आणि किरणच्या या फोटोवरून “देवमाणूस पार्ट ३” येणार आहे का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. कारण हे दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात असते तर त्यांच्या जवळच्या मित्रांनी तसेच सहकलाकरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली असती. त्यामुळे हा कुठलातरी पब्लिसिटी स्टंट असावा असेच एकंदरीत या परिस्थितीवरून अंदाज बांधला जात आहे.