चारचौघी, अवंतिका फेम अभिनेता पार्थ केतकर याने नुकतीच लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळत आहे. शनिवारी ६ जानेवारी रोजी अभिनेता पार्थ केतकरने त्याची गर्लफ्रेंड मानसी नातू सोबत ही लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या या लग्नाला रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, पूर्ण पेठे, प्रतीक्षा लवकर या कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यामुळे पार्थचे हे लग्न खूपच खास ठरलेले पाहायला मिळाले. डिसेंबर २०२२ मध्ये पार्थ आणि मानसीने साखरपुडा केला होता. त्यानंतर जवळपास वर्षभराने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या मधल्या काळात पार्थ त्याच्या चार चौघी या नाटकाच्या दौऱ्यांमध्ये व्यस्त होता.
पार्थ केतकर हा लहान असल्यापासूनच मालिका सृष्टीतून झळकलेला आहे. त्याचे वडील प्रसन्न केतकर हे देखील प्रसिद्ध अभिनेते आहेत. प्रसन्न केतकर यांनी हिंदी तसेच मराठी मालिका सृष्टीत अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मुलगा पार्थने अवंतिका या लोकप्रिय मालिकेतून बालपणीच्या तेजसची भूमिका साकारली होती. वयाच्या चौथ्या वर्षी तो टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पार्थ हा मूळचा पुण्याचा. अवंतिका मालिकेनंतर तो पिंपळपान, रेशीमगाठी या मालिकेत बालकलाकार म्हणून दिसला होता. प्रेरणा एक कला मंच या नाट्यसंस्थेशी जोडल्यानंतर पार्थने राज्य नाट्य स्पर्धांमधून सहभाग दर्शवला. पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक अशा नाट्यस्पर्धा गाजवल्या आहेत.
गोंदया आला रे, गब्बर आज बॅक, सनी, चारचौघी अशा नाटक, मालिका, चित्रपटातून पार्थने सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या चारचौघी नाटकातील वीरेनच्या भूमिकेने पार्थला चांगली लोकप्रियता मिळवून दिली आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात दाखल झालेल्या पार्थला हळूहळू या इंडस्ट्रीत यश मिळू लागले आहे. तुर्तास पार्थ केतकर आणि मानसी नातू या नवविवाहित दाम्पत्याला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.