मराठी मालिका, चित्रपट अभिनेता आस्ताद काळे याला मातृशोक झाला आहे. काही दिवसांपूर्वीच आस्तादची आई सुनीता काळे यांनी या जगाचा निरोप घेतला. सुनीता काळे यांनी बँकेची नोकरी केली होती. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्या चॅरिटेबल ट्रस्ट साठी तसेच काही सांस्कृतिक विभागासाठी काम करत होत्या. आईच्या अशा अचानक जाण्याने आस्ताद खूपच भावुक झाला आहे. “ती गेली…तेव्हा…”, “…म्हणुनी..घनव्याकुळ मी रडलो नाहीये अजून”…असे म्हणत आस्तादने त्याच्या दाटून आलेल्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. आस्ताद काळे एका सुसंस्कृत घरात वाढलेला मुलगा. आई बाबा दोघेही उच्च शिक्षित आणि कलेची जाण असणारे असल्यामुळे आस्तादला त्यांनी लहानपणापासूनच संगीताचे धडे दिले होते. आस्तादने जवळपास १२ वर्षाहून अधिक काळ गायनाची कला अवगत केली होती.
प्रमोद काळे हे त्याचे वडील विविध माध्यमातून लेखनाचे काम करतात. त्यांनी एकांकिका, दिर्घांक लिहिले आहेत. त्यांचे प्रयोग देखील झाले असून त्यांना वेळोवेळी पारितोषिक देखील मिळाले आहेत. तसेच प्रमोद काळे यांना कवितेचीही आवड आहे. दिवाळी अंकासाठी त्यांनी कथालेखनही केले आहे. आई वडिलांचे हेच उपजत गुण घेऊन आस्ताद काळे मराठी इंडस्ट्रीत दाखल झाला..आपल्या नावापुढे तो आईचेही नाव लावतो त्यामुळे आईचे स्थान आस्तादच्या आयुष्यात काय आहे हे वेगळे सांगायला नको. प्रमोद काळे हे देखील पत्नीच्या निधनाने खूपच भावुक झाले आहेत. “Goodbye my dearest पुन्हा कधीतरी नक्की भेटू, तेव्हा राहिलेलं सगळं बोलू” आशा भावना व्यक्त करत त्यानी पत्नीला श्रद्धांजली वाहिली आहे.
आस्तादने त्याच्या करिअरच्या सुरुवातिलाच गर्लफ्रेंड प्राची मते हिला गमावले होते. पुढचं पाऊल या मालिकेवेळी प्राची कॅन्सरच्या गंभीर आजाराला तोंड देत होती. अशातच आस्ताद तिची काळजी घेत असे पण या गंभीर आजाराने प्राचीचे निधन झाले त्यावेळी आस्ताद पूर्णपणे खचून गेला होता. तेव्हा त्याला मालिकेची सहकलाकार स्वप्ना पाटीलने या दुःखातून सवरण्यास बळ दिले होते. आस्ताद बिनधास्त वावरणारा अभिनेता आहे पण आपल्या जवळच्या व्यक्ती अशा आपल्याला सोडून जाताना पाहून तो खूपच हळवा झाला आहे. या दुःखातून त्याला आणि त्याच्या कुटुंबियाला बाहेर पडण्यास बळ मिळो हीच सदिच्छा.