२००९ साली ३ इडियट्स चित्रपटातून चतुरची भूमिका गाजवणारा मराठमोळा अभिनेता ओमी वैद्य लवकरच एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १९ जानेवारी २०२४ रोजी “आईच्या गावात मराठी बोल” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ओमी या चित्रपटात नायकाची भूमिका साकारत असून अभिनेत्री संस्कृती बालगुडे नायिकेची भूमिका साकारत आहे. विद्याधर जोशी, पार्थ भालेराव, सायली निरंजन, नेहा कुलकर्णी, ध्रुव दातार, अभिषेक देशमुख, ईला भाटे असे कलाकार या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अमेरिकेत राहिलेला मराठी मुलगा भारतात येऊन आपल्या आजी आजोबांना भेटतो. वडिलांच्या पश्चात त्यांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी त्याला काय काय करावे लागते आणि मराठी बोलताना त्याची कशी तारांबळ उडते ही धमाल चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे हा चित्रपट पाहून प्रेक्षकांचे मनोरंजन नक्कीच होणार हे ट्रेलर वरूनच लक्षात येते. महत्वाचं म्हणजे या चित्रपटात निळू फुले यांचा जावई देखील एका महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निळू फुले यांचे मराठी सृष्टीत एक मानाचे स्थान आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी त्यांच्या भूमिका अजरामर केल्या आहेत. केवळ अभिनेते म्हणून नाही एक एक माणूस म्हणूनही आणि समाजकार्य करणारा व्यक्ती म्हणूनही त्यांचे मोठे नाव आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत गार्गी फुले या त्यांच्या लेकीने मराठी सृष्टीत अगदी यशस्वीपणे पाऊल टाकले. तर आता त्यांचा जावई म्हणजे गार्गी फुले यांचा नवरा ओंकार थत्ते यांनीही अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली आहे. चित्रपटात ओंकार थत्ते यांनी एक महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या नायकाला मराठी भाषा शिकवण्यात ते मदत करताना दाखवले आहेत. त्यामुळे त्यांचे हे पात्र भन्नाट असणार आहे. याअगोदर ओंकार थत्ते यांनी ‘जी 2 गुडनेस’ या स्नॅक्सच्या जाहिरातीत काम केले होते. विशेष म्हणजे ओंकार थत्ते यांना फोटोग्राफीची आवड आहे.
आईच्या गावात मराठी बोल या पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी ओंकार थत्ते खुपच उत्सुक आहेत. गार्गी आणि ओंकार थत्ते यांना पाब्लो उर्फ अनय हा एकुलता एक मुलगा आहे. सध्या तो त्याचे शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. निळू फुले यांच्यावर बायोपिक बनवण्यात यावा अशी ओंकार आणि गार्गी यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांचे कामही सुरू झाले आहे. हे दोघेही हा चित्रपट लवकरात लवकर प्रेक्षकांच्या भेटीला यावा म्हणून प्रयत्नात आहेत. या दोघांची ही इच्छा लवकरच पूर्णत्वास येवो ही सदिच्छा. पण तूर्तास निळू फुले यांचे जावई अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतायेत ही गोष्टच मराठी रसिकप्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.