महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला गौरव मोरे सध्या लंडन मिसळ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भरत जाधव सोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने तो खूपच खुश आहे. याचनिमित्ताने गौरवने त्याच्या बालपणीच्या काही कटू आठवणी शेअर केलेल्या पाहायला मिळाल्या. गौरव मोरेचे बालपण आणि शिक्षण फिल्टर पाड्यात गेले. त्यामुळे आरे कॉलनी, फिल्म सिटी असं निसर्गाच्या सानिध्यात त्याचं बालपण मजेशीर गेलं होतं. शिकायचं, नोकरी करायची, लग्न करायचं एवढाच काय तो त्याचा ध्यास होता, कारण बाहेरचं जगच त्याला फारसं माहीत नव्हतं. सुरुवातीला त्याचे कुटुंब उल्हासनगरला स्टेशनच्या बाजूला एका ताडपत्रीच्या घरात राहत होते. नंतर ते विठ्ठलवाडीत पुन्हा ताडपत्रीच्या घरात राहू लागले. त्यावेळी गौरवचे वडील बीएमसी मध्ये नोकरीला होते. आईपण छोटी छोटी काम करून घरसंसारत हातभार लावत होती.
घराची शोधाशोध बंद व्हावी म्हणून फिल्टरपाड्यात त्यांनी घरासाठी एक जागा धरून ठेवली. तिथे ताडपत्रीच घर बांधलं. पावसाळ्यात ते घर गळायचं, दहा पंधरा दिवस लाईट नसायची. अशा परिस्थितीतही आपल्या मुलांनी चांगलं शिकून मोठं व्हावं अशी त्याच्या आईची इच्छा होती. वाईट संगत लागू नये म्हणून सातच्या आत घरात असा नियमच त्यांना घालून दिला होता. शिस्तप्रिय असलेल्या गौरवला मात्र सिनेमाची भयंकर आवड असायची. यासाठी तो दुसऱ्यांच्या घरी टीव्ही बघायला जायचा. एकदिवस त्या घरातून गौरवला हाकललं हे त्याच्या आईने पाहिलं. या गोष्टीचा गौरवच्या आईला खूप त्रास झाला ‘तू गेलासच का टीव्ही बघायला एक दिवस टीव्ही नाही बघितला तर मारणार आहेस का तू’ म्हणून आईने त्याला मारलं होतं. तेव्हा गौरवने घरी टीव्ही आणायचा हट्टच धरला. त्यावेळी नऊ दहा हजारांचा टीव्ही घरात आणायचा ही गोष्ट त्यांच्यासाठी मुळीच सोपी नव्हती . गौरव म्हणतो की “मला त्या गोष्टीचं गंभीर्यच नव्हतं, घरात टीव्ही यावा म्हणून मी सहा दिवस गोंधळ घालत होतो. एक दिवस मी शाळेत असताना बहीण डबा द्यायला आली आणि घरात टीव्ही आणला असल्याचे सांगितले.
घरात टीव्ही आणला हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक होतो कधी एकदा शाळा सुटतीये असं मला झालं होतं. कारण त्या टीव्हीचा रिमोट आता माझ्या हातात असणार होता. दुसऱ्यांच्या घरी टीव्ही पाहत असल्याने रिमोट कसा असतो हेच मला माहित नव्हतं. त्यादिवशी मी घरी गेल्यानंतर रिमोट हातात घेतला तो वडिलांनी मागितला तरीही मी त्यांना दिला नाही. त्यादिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत मी टीव्ही पाहिला होता तेव्हा आई बास आता म्हणून ओरडली होती “. शाळेतल्या सहलीचा किस्सा सांगताना गौरव म्हणतो की, शाळेच्या सहलीला जायचं असेल त्यासाठी पैसे नसायचे तेव्हा शाळेचे शिक्षक वर्षाच्या शेवटी ती फी भरा म्हणून सवलत द्यायचे. दुकानाची पिशवी हीच गौरवची बॅग असायची आणि सहलीसाठी त्याला दहा रुपये मिळायचे. हे पैसे तो घरी तसेच घेऊन येत असे. या पैशात काय घ्यायचं या विचारात तो असायचा, पण ही परिस्थिती आपण बदलायची असा तो नेहमी विचार करायचा.