ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे दुःखद निधन….2 दिवसांपूर्वीच रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता पण
कलाविश्वात एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे आज हृदय विकाराने दुःखद निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. रविंद्र बेर्डे हे गेल्या काही वर्षांपासून घशाच्या कॅन्सरने त्रस्त होते. मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता मात्र त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला होता अशातच आज हृदविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याचे समोर आले आहे. रविंद्र बेर्डे यांनी अभिनय क्षेत्रात विविध भूमिकांनी आपली ओळख बनवली होती. त्यांची अजून एक ओळख म्हणजे ते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ होते. गेल्या काही वर्षांपासून रविंद्र बेर्डे अभिनय क्षेत्रापासून दूर होते. आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य ते आपल्या नातवंडांसोबत सुखाने घालवत होते.
वयाच्या विसाव्या वर्षी रविंद्र बेर्डे नभोवाणीशी जोडले गेले होते. आकाशवाणीच्या नभोनाट्यांचे दिग्दर्शन ते करत असत हा काळ होता १९६५ चा. इथूनच त्यांचा नाट्यसृष्टीशी संबंध जुळला. नभोवाणीत त्यांनी २४ वर्षे सेवा केली होती, त्यानंतर १९८७ साली त्यांना नाटकातून अभिनयाची संधी मिळाली. नाटकातून काम करत असताना रविंद्र बेर्डे यांना विविधांगी भूमिका साकारण्याची संधी मिळत गेली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास ३१ नाटकातून काम केले होते. यातूनच पुढे ते चित्रपटातून देखील महत्वाच्या भूमिका साकारू लागले. बेरकी नजर आणि खलनायकी ढंगाचा बाज असल्याने बऱ्याचदा ते विरोधी भूमिकेत दिसले. सोबतच विनोदी, सहाय्यक भूमिकांमुळे त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. ३०० हून अधिक मराठी चित्रपट आणि जवळपास ५ हिंदी चित्रपटातून त्यांनी काम केले होते. यासोबत दूरदर्शन वरील मालिका, जाहिरातीतूनही झळकले.
अष्टरूप जय वैभवलक्ष्मी माता, होऊन जाउदे, हमाल दे धमाल, थरथराट, चंगु मंगु, उचला रे उचला, बकाल, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा अशा चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ ते अगदी भरत जाधव यांच्यासोबत काम केले. १९९५ सालच्या दरम्यान व्यक्ती आणि वल्ली नाटकावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन गेला. त्यानंतर २०११ सालापासून घशाच्या कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी तोंड देत होते. कलेशी एकरूप झाल्याने मी या संकटांवर मात करत आलो असे रविंद्र बेर्डे आपल्या प्रकृतीबाबत म्हणाले होते. नाटकाची आवड त्यांना अजूनही स्वस्थ बसू देत नसे. संगीत देवबाभळी हे नाटक त्यांनी जवळपास चार वेळा पाहिलं होतं. नाटकातील कलाकारांचे काम उत्तम झाले अशी पोचपावती देखील ते नाटक पाहिल्यानंतर देत असतात. आज त्यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीत मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविंद्र बेर्डे यांना आमच्या समूहाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.