कुठल्याही चित्रपट किंवा मालिका हिट होणे हे सर्वस्वी प्रेक्षकांवर अवलंबून असते. त्यामुळे मालिकेच्या लोकप्रियतेसाठी ‘प्रेक्षक’ हा घटक खूप महत्वाचा मानला जातो. प्रेक्षकांनी ठरवलं तर मालिका लगेचच बंदही पाडली जाते आणि जर प्रतिसाद दिला तर वर्षानुवर्षे त्याचा ऋणानुबंध तयार होतो. असाच काहीसा अनुभव गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांनी सुद्धा अनुभवला आहे. एखादी आवडती मालिका जर बंद होत असेल तर ती चालू ठेवा म्हणून मागणी केली जाते. झी मराठीच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ ‘ या मालिकेच्या बाबतीत हेच अनुभवायला मिळाले. तर कित्येक मालिका कंटाळवाण्या झाल्याने प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली आणी म्हणूनच त्या मालिका आपोआप बंद देखील पडल्या.
झी मराठीची आणखी एक मालिका असाच काहीसा निर्णय घेताना दिसली आहे. ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका जानेवारी २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यावेळी संध्याकाळी ६.३० वाजता मालिकेची प्रसारणाची वेळ करण्यात आली होती. पुढे काही महिन्यानंतर ही मालिका रात्री ११ वाजता दाखवण्यात येऊ लागली. पण तरीही अमूल्या आणि वेदांतच्या प्रेमाखातर प्रेक्षकांनी ही मालिका ११ वाजता देखील पाहिली. पण आता झी मराठी वाहिनी ‘ जाऊ बाई गावात ‘ हा नवीन रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे त्यामुळे ही मालिका मधल्या काही दिवसांसाठी रात्री ९ वाजता प्रसारित होऊ लागली. पण येत्या ४ डिसेंबर पासून पुन्हा या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत बदला करण्यात येणार आहे. त्यामुळे ही मालिका दुपारी २.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे जाहीर करण्यात आले.
अवघ्या एका वर्षाच्या आतच या मालिकेच्या तब्बल चार वेळा प्रसारणाच्या वेळेत बदल करण्यात आल्याने प्रेक्षकांनी झी मराठी वाहिनीवर संताप व्यक्त केला आहेत. दुपारी मालिका कोण पाहतं असे म्हणत प्रेक्षकांनी या वेळेत मालिका प्रसारित करू नये अशी मागणी केली आहे. कारण याअगोदर यशोदा मालिकेला देखील याच अनुभवामुळे नुकसान सोसावे लागले होते तर काही दिवसातच मालिकेने निरोप देखील घेतलेला होता. पण ३६ गुणी जोडी या मालिकेला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत आणि म्हणूनच या विराधाचा परिणाम म्हणून झी मराठी वाहिनीने त्यांच्या निर्णयात बदल केला आहे. प्रेक्षकांच्या इच्छेखातर ही मालिका आता पुन्हा एकदा रात्री ११ वाजताच प्रसारित होईल असे आश्वासन झी मराठीने दिलेले आहे. प्रेक्षकांचे मत लक्षात घेऊनच वाहिनीने हा बदल घडवून आणला आहे.