सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत… लोकप्रिय गाण्यातील मुलगी ४० वर्षांनंतर दिसते अशी मुलगा देखील आहे अभिनेता
१९८२ मध्ये “उंबरठा” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ जब्बार पटेल यांनी केले होते. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या,चांद मातला मातला, गगन सदन अशी चित्रपटातील गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. स्मिता पाटील, गिरीश कर्नाड यांनी या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या तर आशालता वाबगावकर, रवी पटवर्धन, श्रीकांत मोघे, सतीश आळेकर, दया डोंगरे यासारखे मातब्बर कलाकारांनी चित्रपटाला साथ दिली होती. या चित्रपटात पौर्णिमा गणू ही बालकलाकार झळकली होती, तिने स्मिता पाटीलच्या मुलीची भूमिका साकारली होती. उंबरठा चित्रपट प्रदर्शित होऊन ४१ वर्षे झाली आहेत त्यामुळे ही बालकलाकार आता काय करते, आणि कशी दिसते असे प्रश्न अनेकांना पडले असतील.
चित्रपटाची नायिका स्मिता पाटील या महिलाश्रमात जाऊन नोकरी करतात. मात्र, त्यामुळे त्या लेकीपासून आणि नवऱ्यापासून दुरावतात. यातल्या लहान मुलीची भूमिका पौर्णिमाने केली होती. “सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे … ह्या लोकप्रिय गाण्यात ती पाहायला मिळते. पौर्णिमा गणू आजही कलाविश्वात सक्रीय आहेत. सध्या त्या मालिका आणि चित्रपटामध्ये सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारताना दिसत आहेत. पौर्णिमा यांनी बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी अनेक चित्रपट, नाटक तसेच मालिकांसाठी काम केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मुलानेही कलाविश्वात पदार्पण केल्याचं दिसून येतं. राजवाडे अँड सन्स, सुराज्य, तुझं माझं जमेना, चिंटू, पेट पुराण, तुंबाडाचे खोत , पांडू, एका काळेचे मणी, वाडा चिरेबंदी अशा नाटक, चित्रपट तसेच मालिकांमध्ये ततानी महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत.
पौर्णिमा गणू आता पौर्णिमा मनोहर या नावाने ओळखल्या जातात. अभिनेता ऋषी मनोहर हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. ऋषीदेखील अभिनेता असून लेखन, दिग्दर्शन अशा तिन्ही क्षेत्रात तो वावरताना दिसत आहे. लवकरच त्याचे अभिनित केलेले काही प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कन्नी हा त्याने अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट आहे. मे महिन्यात तन्मयी पेंडसे हिच्यासोबत ऋषी मनोहरचा साखरपुडा संपन्न झाला होता. एका काळेचे मणी , मेक अ विष अशा प्रोजेक्टमध्ये ऋषीने अभिनेता म्हणून तसेच दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.