या कारणामुळे महाराष्ट्रापेक्षा लंडनमध्ये शूटिंग करणं सोप्पं….हेमंत ढोमे होतोय प्रचंड प्रमाणावर ट्रोल
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे याने केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो अनेक ठिकाणी मुलाखती देताना दिसतो आहे. झिम्मा २ चित्रपटाला महिला वर्गाकडून विशेष प्रतिसाद मिळत आहे. मात्र दुसरीकडे हेमंत ढोमेचे वक्तव्य सध्या प्रचंड प्रमाणावर व्हायरल होत आहे. या वक्तव्यामुळे हेमंत ढोमे कधी नव्हे ते ट्रोलर्सच्या तोंडघशी पडला आहे. हेमंत ढोमे हा फारसा कधी चर्चेत राहिला नाही पण झिम्मा २ चित्रपटामुळे त्याने जे वक्तव्य केले आहे त्यामुळे तो आता चांगलाच प्रकाशझोतात आला आहे.झिम्मा २ चित्रपटाचे शूटिंग लंडनला पार पडले. तिथल्या अनुभवाबद्दल तो म्हणतो की, ” लंडनमध्ये चित्रपटाच्या शुटिंगची परवानगी घेण्याची प्रक्रिया ही खूपच सुटसुटीत आणि वन विंडो आहे.
तुम्ही तिथल्या रस्त्यांवर कुठेही शूट केलं, गोंधळ घातला, किंवा कोणाच्याही घरावर कॅमेरा फिरवला तरी तुम्हाला कोणीही विचारायला येत नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने मी मराठी निर्मात्यांना सांगेन की महाराष्ट्रापेक्षा लंडनमध्ये शूटिंग करणं खूप सोप्पं आहे. ” हेमंत ढोमेचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या वक्तव्यामुळे तो आता प्रचंड ट्रोल होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी त्याला लंडनमध्येच राहण्याचा सल्ला दिला आहे. तर अनेकांनी त्याचा खरपूस समाचार घेत त्याला तुझा चित्रपट सुद्धा लंडनमध्येच प्रदर्शित कर असे म्हटले आहे. हेमंत ढोमेने चित्रपटाच्या तिकिटावरून देखील एक वक्तव्य केलं होतं. झिम्मा चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता त्यामुळे या चित्रपटाचा पुढचा भाग त्याने काढण्याचे ठरवले. झिम्मा २ हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी जमली होती.
पिंपरी चिंचवड मधील थिएटर्स बाहेर तर अगदी हाऊसफुल्लचे बोर्ड लावण्यात आले होते. पहिल्याच दिवसात झिम्मा २ चित्रपटाने बॉक्सऑफिसवर १.२० कोटींचा गल्ला जमवला होता. ही यशस्वी वाटचाल पाहून हेमंत म्हणाला आहे की, “मराठी प्रेक्षकांना चित्रपट गृहाचं तिकीट परवडत नाही हा गोड गैरसमज आपण करून घेतला आहे. सामान्य माणसाला बिचाऱ्याला महिन्याला एकच तिकीट परवडतं अशी समजूत आपण केली आहे. एखादा चित्रपट सकस मनोरंजन करणारा असेल तर नक्कीच आठवड्याला सिनेमे पाहतील. “