झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स या शोचा महाअंतिम सोहळा शनीवारी २५ नोव्हेंबर रोजी धुमधडाक्यात पार पडला. यावेळी गौरी अलका पगारे हिने तिच्या दमदार गायकीने परिक्षकांची मनं जिंकत विजेतेपदावर स्वतःचे नाव कोरले. गौरी पगारे हिने सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पर्वात विविध धाटणीची गाणी गायली होती. कोपरगाव तालिक्यातील ब्राह्मणगावात ती वास्तव्यास आहे. गौरीच्या आईनेच तिचा सांभाळ केला. गौरी गाणं गाते म्हणून तिच्या गावातली लोकं या मायलेकींना नावं ठेवत होती. तमाशात गायला जा असे तिला वारंवार हिनवत होती मात्र आईचा विश्वास गौरीला या शोमध्ये घेऊन आला. याच शोमध्ये गौरीने तिचे वडिलांचे नाव हटवावे आणि आईचे नाव लावावे अशी अलका पगारे यांनी इच्छा व्यक्त केली होती तेव्हा अमृता खानविलकर जेव्हा या शोमध्ये आली होती तेव्हा अमृताने गौरीच्या नावाची “गौरी अलका पगारे” अशी पाटी जाहीर करत आजपासून गौरी तिचे नाव बदलतीये अशी घोषणा केली.
तेव्हा गौरीच्या आईला तिचे अश्रू थांबवता आले नाही यामुळे उपस्थितांच्या डोळ्यात देखील अश्रू दाटून आले होते. वैशाली माडेला तर गौरीच्या सुरेल गायकीने भुरळ पाडली होती. तिला गाण्याचे योग्य धडे देता यावे म्हणून गुरुकुल मध्ये वैशाली माडेने प्रयत्न केले. आज तिने घेतलेल्या कष्टाचे फळ तिला मिळाले असेच चित्र काल वैशाली समोर उभे राहिले होते. एकीकडे गौरी पगारे या शोची विजेती झाली पण दुसरीकडे जयेश खरे हा देखील या शोच्या विजेतेपदाचा खरा दावेदार होता असे म्हटले जात होते. जयेश खरे सोशल मीडियावर हिट झाला तेव्हा त्याला अजय अतुल यांनी त्यांच्या शाहीर साबळे चित्रपटातील गाण्यासाठी संधी मिळवून दिली होती. तेव्हाच जयेश खरे पुढे जाऊन कुणी मोठा गायक होईल अशी भावना व्यक्त करण्यात आली.
त्यानंतर जयेश खरे सारेगमप लिटिल चॅम्प्सचा स्पर्धक बनला. नागराज मंजुळे यांच्या नाळ २ चित्रपटातही त्याने ‘ डराव डराव’ हे गाणं गायलं. जयेशच्या आवाजाला पहाडी आवाजाचा बाज आहे. त्यांच्या कणखर आवाजाने तो या क्षेत्रात नक्कीच नावलौकिक करणार याचीही खात्री आहे. त्याचमुळे या शोमध्ये गौरी पगारेला विजेतेपद देण्यात आले असे नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. गौरीचा आवाज उत्तम आहे यात मुळीच शंका नाही पण तिलाही या क्षेत्रात योग्य ती संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असे आता बोलले जात आहे. झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्सचे जज उत्तमच होते त्यांनी योग्य ती पारख करूनच निर्णय घेतला कारण आपल्यापेक्षा ते ह्या गोष्टीत पारंगत आहेत आणि त्यांनी योग्यच निर्णय घेतला असावा हेच स्पष्ट दिसून येते.