क्रांती रेडकरच्या मुलींनी स्वतःचे पैसे बनवूयात म्हणून काढले नोटेचे चित्र… गांधीजींचे चित्र पाहून नेटकऱ्यांनी केल्या मजेदार कमेंट्स

क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिच्या पाहण्यात आलेले मजेशीर व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते तर कधी तिच्या जुळ्या मुलींची धमाल मस्ती व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणते. तिच्या मुलींच्या या मजेशीर व्हिडिओचे तसेच त्यांच्या निरागसतेचे नेहमीच कौतुक केले जाते. छबिल आणि गोदो या क्रांती रेडकरच्या जुळ्या मुली आहेत. दोघीही आता शाळेत जाऊ लागल्या आहेत. या दोघी एकमेकिंची कायम साथ देत असतात. क्रांतीच्या एका मुलीच्या पायाला दुखापत झाली होती तेव्हा तिच्या पायाला प्लास्टर करण्यात आले होते.तेव्हा क्रांतीची दुसरी लेक आपल्या बहिणीची खूप काळजी घेत होती. तिला शाळेत जाण्यासाठी वॉशरूमला जाण्यासाठी देखील ती तिची मदत करत होती. तेव्हा इतक्या कमी वयातच आलेला आपल्या लेकीचा समजूतदारपणा पाहून क्रांतीला खूप भरून आलं होतं. नुकताच क्रांतीने तिच्या मुलींचा आणखी एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. लहान मुलांच्या डोक्यात कधी काय कल्पना येईल याचा विचारही कोणी करत नसतो. पण क्रांतीच्या मुलींनी चक्क स्वतःचे पैसे बनवावेत अशी एक निरागस इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी गोदोने कागदावर नोटेचे चित्र काढले आहे.

गोदोने काढलेलं हे चित्र पाहून क्रांतीला त्यात एक गंमत वाटली आणि तिने हे चित्र सोशल मिडियावरच शेअर करून ही किती रुपयांची नोट आहे? ससा प्रश्न तिला विचारला. कारण गोदोने चुकून पाचचा अंक उलटा काढलेला होता. अर्थात गोदोने काढलेलं हे नोटेचं चित्र पाहून अनेकांना तिची खूप कमाल वाटली. पण महत्वाचं म्हणजे नेटकऱ्यांना गोदोने काढलेल्या गांधीजींचे चित्रच खूप आवडले. अर्थात हे गांधीजींचे चित्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेणारे होते. लहान मुलांमध्ये किती निरागसता असते आणि त्यातही नोटेवर असलेले गांधीजींचे चित्र काढायचे हे तिने विशेष लक्षात ठेवले होते, याबद्दल तिचे नक्कीच कौतुक करायला हवे. नेटकऱ्यांनी देखील गोदोच्या या कमाल टॅलेंटचं मोठं कौतुक केलं आहे. तिने गांधीजी लक्षात ठेवून ५० रुपयाची नोट बनवली हेच खूप महत्त्वाचं आहे असे तिच्या चाहत्यांनी म्हटले आहे. तर अनेकांनी गांधीजींच्या चित्रावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. क्रांतीच्या मुलींचा हा मजेशीर व्हिडीओ अल्पावधीतच खूप व्हायरल होताना दिसत आहे आणि त्यावर नेटकऱ्यांच्याही मजेशीर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.