गेल्या वर्षभरापासून ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे . त्यामुळेच ही मालिका महाराष्ट्राची नंबर एकची मालिका बनली आहे. या मालिकेतील नायक नायिकेइतकेच सहाय्यक भूमिकेतील पात्र आणि विशेष म्हणजे खलनायकी ढंगाचे पात्रही लोकप्रिय झाले आहेत. मालिकेची खलनायिका म्हणजेच प्रियांका तेंडोलकर प्रियाच्या भूमिकेमुळे विशेष ओळखली जाते. गेली अनेक वर्षे या इंडस्ट्रीत काम केल्यानंतर प्रियांकाला अशा एका वेगळ्या धाटणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. आपल्या भूमिकेवर लोक एवढं प्रेम दाखवतात त्यामुळे प्रियांका खूप भारावून गेली आहे. प्रेक्षकांचं हे प्रेम तिच्या पाठीशी आहेच पण आता या यशामुळे तीचं एक स्वप्न देखील सत्यात उतरलं आहे. खरं तर ही मालिका मिळण्याअगोदरच प्रियांकाचे घर घेण्याचे स्वप्न सत्यात उतरले होते.
पण दोन दिवसांपूर्वी तिथला परिसर पाहून तिला याची जाणीव झाली असे ती म्हणते. प्रियांकाने रायगड जिल्ह्यातील कोलाड या गावात टुमदार फार्महाऊस बांधलं आहे. घरासमोर पडवी, त्यात छानसा लाकडी झोपाळा. अंगणात विविध फुलांनी सजलेली हिरवीगार झाडं आणि समोरच असलेलं तुळशी वृंदावन त्यात असलेली डेरेदार तुळस पाहून प्रियंकाला तिचं हे स्वप्न आता सत्यात उतरल्याची जाणीव झाली आहे. या फार्महाऊसचं स्वप्न आई आणि बाबांसह तिने देखील पाहिलेलं होतं. या स्वप्नांचा पाठलाग करत असताना ती म्हणते की, खूप वर्षांपासून जे स्वप्नं बघितलं ते २ वर्षांपूर्वी पूर्ण झालं. पण ते खऱ्या अर्थानं पूर्ण झालंय हे मात्र मला २ दिवसांपूर्वी लक्षात आलं. आपण स्वप्नं पाहतो ते पूर्ण करायला पळतो, कष्ट घेतो.मग लवकर पूर्ण होत नाही म्हणून देवाला, नशिबाला दोष देतो. मग कुठे ते पूर्ण होत.पण ह्या गोष्टीसाठी इतकी वाट पहिली की ते कधी पूर्ण झाल कळलं नाही. २ दिवसांपूर्वी ही जाणीव झाली की ही सुंदर वास्तू,इथली झाडं,फुल सगळी आपली आहेत. हा व्हरांडा जो काही वर्षां पूर्वी फक्त स्वप्नात असायचा आज तिथल्या झोपाळ्यावर बसून मी माझी आवडती कॉफी पीत आहे. Thank you Mummy pappa तुमच्या स्वप्नात मला सामील केल्याबद्दल आणि देवा आमचं स्वप्नं पूर्ण केल्याबद्दल!
प्रियांका तेंडोलकर हिने तिच्या या फार्महाऊसचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कोलाड येथे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या तिच्या या फार्महाऊसला भेट देण्यासाठी तिचे सहकलाकार देखील तेवढेच उत्सुक आहेत. कोलाडच्या तिच्या गावात कुंडलिका नदी आहे. तिथल्या स्थानिक धरणातून रोज सकाळी पाणी सोडण्यात येते हे पाणी राफ्टिंग खेळासाठी सर्वोत्तम मानले जाते. व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग असे साहसी क्रीडा प्रकार इथे खेळले जातात. त्यामुळे या गावाला पर्यटकांची विशेष गर्दी असते. सध्या प्रियांका तिचा क्वालिटी टाइम या फार्महाऊसमध्ये घालवत आहे.