‘इंडियन आयडॉल’ हा अशा शोपैकी एक आहे ज्याने नवख्या कलाकारांना एक नवे व्यासपीठ मिळवून दिले आहे. या शोच्या पहिल्या सिजनमध्ये मराठमोळ्या अभिजित सावंतने बाजी मारलेली पाहायला मिळाली होती. पण आता ‘अभिजित सावंत विजेता झाला नव्हता तर त्याला विजेता करण्यात आले होते’ अशी एक खदखदच नव्हे तर खळबळजनक दावा त्या पर्वाच्या उपविजेत्याने तब्बल १९ वर्षांनंतर केला आहे. या शोचा उपविजेता अमित साना याने चॅनलवर पक्षपातीपणा केल्याचा आरोप लावला आहे. अभिजीतला शो जिंकून देण्यात मोठा राजकीय प्रभाव असल्याचंही त्याने एका मुलाखतीत म्हटलं आहे. नुकतीच अमित सानाने सिद्धार्थ काननला मुलाखत दिली आहे.
त्यात आयोजकांवर आरोप लावताना तो म्हणतो की, ‘इंडियन आयडॉल’लाच अभिजीत सावंतने हा शो जिंकावा अशी इच्छा होती. तो शोचा टर्निंग पॉइंट होता जेव्हा शिल्पा शेट्टी अभिजीतच्या हसण्याबद्दल खूप बोलली. पण त्यानंतर बर्याच गोष्टी बदलल्या. त्यानंतर त्याला गांभीर्याने घेतले गेले. माझ्या व्होटिंग लाइन शेवटच्या दिवसाच्या दोन दिवस आधीच ब्लॉक झाल्या होत्या. ते स्वतः कधीच ब्लॉक होत नाही.” पुढे अमित साना असेही म्हणतो की, “अभिजीतच्या विजयावर राजकीय प्रभाव होता. अभिजीतचा विजय हा राजकीय प्रभावामुळेच झाला. चॅनेलच्या कृतींचे मी समर्थन करतो कारण त्यांना विजेता स्पर्धक निवडण्यापूर्वी अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. मी अभिजित सावंतची माफी मागतो की १९ वर्षांनंतर हे प्रकरण समोर आणताना मला तेवढंच वाईट वाटत आहे. आमच्यात अजूनही छान बॉंडिंग आहे. ” अशी एक खदखद अमित साना याने बाहेर काढली आहे.
आता अमितच्या या वक्तव्यानंतर इंडियन आयडॉलचे आयोजक तसेच अभिजित सावंत यावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे गरजेचे आहे. अमित सानाने हे प्रकरण १९ वर्षांनेच का बाहेर काढले त्याच्या मनात अभिजित सावंतबद्दल आकस तर नाही ना अशी चर्चा देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान इंडियन आयडॉलमध्ये उपविजेतेपद मिळवल्यानंतर अमित तेलगू, पंजाबी, बंगाली भाषिक चित्रपटात गाणी गाताना दिसला. अभिजितने देखील प्रकाशझोतात आल्यानंतर अनेक हिंदी मराठी चित्रपटात गाणी गायली. पण एका कालावधीनंतर त्यालाही कुठे प्रसिद्धी मिळत नसल्याचे चित्र समोर आले होते.