दिवाळी म्हटलं की सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. रांगोळ्या, दिवे, नवीन कपडे, फटाके यासोबतच फराळाला देखील विशेष महत्व असते. पण रोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात कित्येक काम करणाऱ्या महिलांना फराळ बनवण्यासाठी वेळ मिळत नसतो. मग अशा वेळी विकतचा फराळ आणून दिवाळी साजरी केली जाते. अर्थात ज्यांना फराळ बनवायलाही जमत नाही ती मंडळी सुद्धा अशा पर्यायाचा विचार करतात. त्यामुळे घरच्या फराळाची चव मिळावी म्हणून अनेकजण घरगुती पध्दतीने बनवणाऱ्या शोध घेतात. मराठी सृष्टीत देखील अशा काही सेलिब्रिटींनी फराळ विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर या गेल्या काही वर्षांपासून “आईच्या हातची चव! सीमा फूड्स” या नावाने हा व्यवसाय करतात. घरगूती पद्धतीने बनवलेल्या त्यांच्या या चविष्ट फराळाला सेलिब्रिटींकडून विशेष मागणी असते. अगदी प्रार्थना बेहरे आणि हिमानी निलेश या अभिनेत्रींनी त्यांच्या या फराळाची चव चाखली आहे. तर सुंदरा मनामध्ये भरली मालिका फेम अभिनेत्री अक्षया नाईक हिनेही दिवाळी फराळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. अक्षयाला खाण्याची आणि खाऊ घालण्याची विशेष आवड आहे. “कल्चर किचन” या नावाने तिने हा व्यवसाय सुरू केलेला आहे. ज्यात तिला सौरभ परांजपे सारखा पार्टनर मिळाला आहे. अभिनेता समीर परांजपे याचा तो धाकटा भाऊ आहे. सौरभला जेवण बनवण्याची विशेष आवड आहे. अक्षया आणि सौरभने मिळून हा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. साजूक तुपातले लाडू, नाचणीचे ड्रायफ्रूट, गूळ घालून बनवलेले लाडू, मुगडाळीची चकली अशा फराळाला विशेष मागणी असते. फराळासोबतच त्यांच्या विविध आकारातील चॉकलेट्सना देखील विशेष मागणी असते.
त्यामुळे या व्यवसायात त्यांचा आता चांगलाच जम बसू लागला आहे. तर गेली अनेक वर्षे याच व्यवसायात गुंतलेल्या अभिनेत्री किशोरी गोडबोले यांना विसरून कसे जमेल. अभिनेत्री किशोरी गोडबोले यांच्या सासूबाई सुमती गोडबोले यांनी या व्यवसायाची सुरुवात केली होती. आपल्या मुलाने या व्यवसायात लक्ष घालावे अशी त्यांची इच्छा होती. तेव्हा सचिन गोडबोले यांनी हा व्यवसाय वाढीस आणला. गोडबोले स्टोअर्स या नावाने दादर येथे त्यांचा हा व्यवसाय आहे. त्यांच्या दिवाळी फराळाला परदेशात सुद्धा मोठी मागणी असते. हा व्यवसाय वर्षाकाठी कोट्यवधींची उलाढाल करतो. किशोरी गोडबोले यांचाही या व्यवसायाला मोठा हातभार लागलेला आहे.