त्या प्रचंड मानसिक त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करायला गेले… अभिनेत्रीने सांगितला तो कठीण प्रसंग
प्रत्येकाच्या आयुष्यात असा काही प्रसंग येतो ज्यामुळे तुमच्या मनात आता सगळं काही संपलंय असा विचार येतो तेव्हा तुम्ही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत असतात. असाच प्रसंग आई कुठे काय करते मालिका फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्याही आयुष्यात आला. अश्विनी महांगडे ही मूळची वाई, सताऱ्याची. वडील रंगभूमीवरचे हौशी कलाकार त्यामुळे शालेय शिक्षण घेण्यासोबतच तिने नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. पुढे वडिलांच्या इच्छेला झुगारून ती मुंबईत दाखल झाली. काम मिळावे म्हणून अनेक ऑडिशन दिल्या पण यश मिळत नसल्याने प्रचंड मानसिक त्रास झाला. आपल्याला काम मिळत नाही या नैराश्येत अश्विनीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
आता आत्महत्याच करायची या विचाराने ती मीरा रोडला शिवार गार्डन आहे तिथल्या तलावाजवळ गेली. त्यादिवशी तिला सतत मैत्रीण वैशाली भोसले आणि होणारा नवरा निलेश जगदाळे यांचे फोन येत होते. टोकाचे पाऊल उचलण्यागोदर तू फक्त नानांशी बोल एवढेच ते दोघेही तिला समजावत होते. तेव्हा मुंबईत असलेल्या मावशीच्या घरी नाना होते. फोन केल्यानंतर मावशीची मुलगी नानांना त्या गार्डनमध्ये घेऊन आली. नानांनी मावशीच्या मुलीला घरी जायला सांगितले. त्यानंतर रडू कोसळलेल्या अश्विनीच्या डोक्यावर हात ठेवत ते तिला एवढेच म्हणाले की, “परमात्म्याने तुला काहीतरी चांगलं करायला इथे पाठवलं आहे. आणि तू तुझ्या आयुष्यात अजूनपर्यंत ते केलेलं नाहीयेस मग तुझी सुटका कशी होणार आहे इथून. ते बेस्ट करण्यासाठी थांब. आणि मी थांबले. मी जे काही प्रतिष्ठानच्या माध्यमातून थोडंस केलंय त्या आजूबाजूच्या लोकांना वाटतंय. ही सगळी सुरुवात नानांमुळे झाली फक्त नानांमुळे मी थांबले.
मी पुन्हा ऑडिशन दिल्या, वर्कआऊट करून स्वतःला बारीक केलं, झपाटून कामाला लागले.चांगली चांगली पुस्तकं वाचू लागले. मी आताच्या पिढीला सांगू इच्छिते की संकटं प्रत्येकाच्या आयुष्यात येतात.पण त्यावेळेला तुम्ही कुठल्यातरी योग्य माणसाशी बोललं पाहिजे. गेल्याच वर्षी माझ्या जवळच्याच माणसाला आम्ही गमावलंय त्याचा आम्हाला अजूनही खूप पश्चाताप आहे, की आम्ही त्याच्याशी बोलायला हवं होतं.आम्ही तिथे कमी पडलो. तुम्ही गरजेचे नाही आहात असे तुम्हाला वाटायला लागते पण तुम्ही तेवढेच महत्वाचे असतात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात.” असे म्हणत अश्विनीने त्या कठीण काळातून स्वतःला सावरण्याचा निर्णय घेतला होता.