सोशल मीडियावर ‘खद खद मास्तर ‘ अशी ओळख मिळवलले कराळे मास्तर सध्या राजकीय मंचावरही तुफान फटकेबाजी करताना दिसत आहेत. विदर्भीय बोलीभाषेतून ते तरुणांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याचे काम करतात. त्यांच्या विनोदी भाषा शैलीमुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पाहोचले आहेत. कराळे मास्तर म्हणजेच नितेश कराळे हे मूळचे वर्ध्याचे. त्यांच्या वडिलांचे आलुबोंड्याचे म्हणजेच वडापावचे दुकान आहे. त्यामुळे आपल्या मुलाने शाळा शिकून मोठं व्हावं असं त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं. कराळे मास्तरांना दहावीत ६४ टक्के गुण मिळाले होते. चांगले गुण मिळणारे विद्यार्थी सायन्समध्ये प्रवेश घेत होते त्यामुळे कराळे यांनी सुद्धा ११ वी सायन्स घेतलं. १२ वीच्या परीक्षेत त्यांना दहावी पेक्षा एक टक्का अधिक गुण मिळाला होता. पुढे पदवीचे शिक्षण घेताना शेवटचे वर्ष त्यांनी तब्बल चार वेळा परीक्षा देऊन पास केली होती.
स्पर्धा परीक्षांचे वेध लागल्यानंतर कराळे मास्तर मित्रासोबत पुण्याला आले. वर्षभरात त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्या पण अंतिम टप्प्यात त्यांना अपयश सोसावे लागले. एकदा तर नितेश आता पोलीस बनणार अशी बातमीच पसरली पण त्यावेळीही शेवटच्या फेरीत त्यांना अपयश मिळाले. शेवटी कंटाळून त्यांनी पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या तरुणांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्याचे काम सुरू केले. अल्पावधीतच त्यांच्या शिकवण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे कराळे मास्तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. आज त्यांच्याकडे स्पर्धा परीक्षेचे धडे गिरवण्यासाठी अनेक तरुणांची रांग लागते. याच प्रसिद्धीमुळे कराळे मास्तरांना चक्क मराठी बिग बॉसची देखील ऑफर मिळाली होती. याबद्दल कराळे मास्तरांनीच याचा खुलासा करताना म्हटले होते की, ” मला बिग बॉसकडून फोन आला की तुम्ही इन्टरेस्टेड आहात की नाही? मी त्यांना म्हणालो ‘अजिबात नाही. त्या पांचट प्रोग्राममध्ये येऊन मी काय करू?….कारण मला ते आवडतच नाही ते सगळे भांडणार, तंडणार , तमाशा करणार, मी हे डायरेक्ट त्यांच्या तोंडावर म्हणलं तर ते मला म्हणाले की, सर तुम्ही असं कसं बोलता?…
मी म्हटलं तो पांचटच प्रोग्राम आहे. त्यांनी पुन्हा एक विनंती केली की आमचे डायरेक्टर आणि प्रोड्युसर आहेत त्यांच्यासोबत एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊ. मी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली त्यात मी स्पष्ट सांगितलं की, मला काही इंटरेस्ट नाही त्याच्यात तुम्हाला मला बोलवायचंच असेल तर तीन महिने माझ्याकडे वेळ नाहीये. एवढा काही रिकामटेकडा नाहीये मी. मला जर बोलवायचंच असेल तर एक किंवा दोन दिवस गेस्ट म्हणून येईल …यावर तुम्ही विचार केला आणि नाही केला तरी चालेल. “, पुढे कराळे मास्तर चित्रपटाच्या ऑफर बद्दलही खुलासा करताना म्हणतात की, ” कोकणातून दौरा करून आलो तेव्हा मला एक दिग्दर्शक भेटले. त्यांनी मला चित्रपटासाठी विचारले, पण मी नाही म्हणालो कारण माझे एवढे विद्यार्थी आहेत जे पैसे देऊन माझ्याकडे शिकायला येतात. त्यांना आठ आठ दिवसाच्या सुट्ट्या देणं माझ्यासाठी अजिबात शक्य नाही. तुम्ही जर घेणारच असाल तर रविवारी येतो, मी सहसा सलग सुट्ट्या कधी देत नाही कारण हे पोट्टे तोंडावर नाही पण मागे बोलतील लेकाचे. ह्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि माझ्याही पोटापाण्याचा कारण हे माझे दोन नंबरचे पैसे नाहीत जे इमानदारीने मी कमावतो. याच विचाराने मी कुठेही दौरे असले की फक्त रविवारीच जातो.”