दुःखद बातमी! वैशाली शिंदे यांची आजाराशी झुंज अखेर अयशस्वी… अखेरच्या दिवसात आर्थिक परिस्थिती पुढे हतबल
आपल्या बुलंद गायकीने आंबेडकर चळवळीला बळ मिळवून देणाऱ्या गायिका वैशाली शिंदे यांचे आज शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. वैशाली शिंदे या गेले काही वर्षे मधुमेहाने त्रासलेल्या होत्या, त्यांच्या पायाला गँगरीन झाल्याने त्यांना मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र यातच त्यांचे निधन झाले असल्याचे समोर आले आहे. वैशाली शिंदे या ६२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वैशाली शिंदे यांच्या पश्चात त्यांना एक मुलगाही आहे. आज शुक्रवारी दुपारी १२ वाजता घाटकोपर येथील भटवाडी स्मशानभूमीत वैशाली शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वैशाली शिंदे या त्यांच्या अखेरच्या दिवसात आर्थिक परिस्थितीपुढे हतबल झाल्या होत्या. स्वतःवरील उपचारासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे सुद्धा नव्हते. डॉ हर्षदीप कांबळे आणि डॉ आठवले यांनी शक्य तेव्हढी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. वैशाली शिंदे या मूळच्या सोलापुर जिल्ह्यातील मोहोळच्या. एका कलाकार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वैशाली शिंदे यांचे आईवडील दोघेही आंबेडकर तसेच बुद्धांची महती सांगणारी गीते गात होते. सोबतच ते पोटापाण्यासाठी मोलमजुरीची कामं करत होती. यातूनच वैशाली यांनाही गाण्याची आवड निर्माण झाली. वैशाली यांचे आईवडील कामानिमित्त पुण्याला आले. लग्नानंतर त्या मुंबईत राहायला आल्या. विष्णू शिंदे यांच्यासोबत टीसनी लग्न केले होते. लक्ष्मण राजगुरू यांच्याकडे त्यांनी गाणे शिकले होते. कव्वाली, भीमगितं यातून वैशाली शिंदे यांनी आपल्या बुलंद आवाजाने सर्वांची मनं जिंकून घेतली होती.
प्रल्हाद शिंदे यांच्यासोबत त्यांना गाण्याची संधी मिळाली होती. माझ्या भीमाच्या, बोलो जयभीम बोलो, धम्मचक्र, भीमजी ना होते तो अशा गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकून घेतली होती. भीम गीतांसोबत वैशाली शिंदे यांनी लोकगीतं देखील गायली होती. हॅलो मी गंगी बोलतेय, मला पावन झाला म्हसोबा अशा लोकगीतांमुळे देखील त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. राधा कृष्णाची धमाल, वाकून टाक सडा, अफलातून सामना, मी बाबुराव बोलतोय या अल्बमसाठी त्यांनी गाणी गायली होती. वैशाली यांच्या अशा जाण्याने कलासृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.