रोहित पवार यांच्याकडुन सोशल मीडिया स्टार्सना मॅच पाहण्याची ऑफर…पण धनंजय पोवार यांनी सांगितली सत्य परीस्थिती
गहुंजे येथे आज भारत विरुद्ध बांगलादेश सामना रंगला आहे. या मॅचसाठी विधानसभेचे सदस्य रोहित पवार यांनी सोशल मीडिया स्टार्ससाठी एक ऑफर देऊ केली होती. सोशल मीडियावर ज्यांचे मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोअर्स आहेत त्यांच्यासाठी या मॅचचे तिकीट मोफत देण्यात आले होते. तर पार्किंगही मोफत करण्यात आले होते. याशिवाय अशा स्टार्ससाठी माफक दरात जेवणही मिळणार अशी एक भन्नाट ऑफर त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केली होती. इंस्टा इन्फ्लुएंझर अथर्व सुदामे याच्यासोबत रोहित पवार यांनी एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओत रोहित पवार यांनी सोशल मीडिया स्टार्सना ही ऑफर देऊ केली होती. मात्र आता स्वतः सोशल मीडिया स्टार धनंजय पोवार यांनी या ऑफरचा लेखाजोखा समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
धनंजय पोवार हे सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरहून ते ही मॅच पाहायला गहुंजे स्टेडियम येथे आलेले आहेत. पण रोहित पवार यांनी दिलेल्या ऑफरनुसार असं काहीच घडत नाही असे धनंजय पोवार यांचे म्हणणे आहे रोहित पवार यांनी पाणी आणि जेवण माफक दरात दिले जाईल असे आश्वासन दिले होते मात्र धनंजय पोवार यांनी तिथल्या खऱ्या परिस्थितीचा आढावा व्हिडिओतून दिला आहे. धनंजय पोवार नाराजी दर्शवत म्हणतात की, ” रोहित पवार यांनी खाण्याची, पाण्याची सोय केली जाईल . पाणी तर आम्हाला मिळालं नाही, कदाचित बाहेर मिळत असेल आम्ही काय बाहेर गेलो नाही. पण भेळ आम्हाला १०० रुपयांना मिळाली आहे.तुम्ही सांगितलं होतं की अगदी कमीत कमी रेटमध्ये देणार पण साहेब बरोबर मिळालं नाही आम्हाला. भेळ १०० रुपये, लाह्या ७० रुपये, कोल्ड्रिंक ७० रुपये , आणि बर्गर २५० रुपये आम्हाला सांगितले.
” धनंजय पोवार यांच्यासोबत त्यांचे आणखी काही मित्र ही मॅच पाहण्यासाठी गहुंजे स्टेडियममध्ये दाखल झाली आहेत. पण जशी रोहित पवार यांनी ऑफर देऊ केली होती तसं काहीच न घडल्याने धनंजय पोवार यांनी नाराजी दर्शवली आहे. अर्थात रोहित पवार यांना आमचा विरोध नक्कीच नाही पण त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचायला हवी जेणेकरून त्यांनी दिलेल्या सोयी सुविधांमध्ये काहीतरी बदल घडून येईल. रोहित पवार यांनी सोशल मीडिया स्टार्सना ही ऑफर दिली मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही अशी खंत धनंजय पोवार यांनी व्यक्त केली आहे. ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवी जेणेकरून ते या गोष्टीवर लक्ष देतील.