अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या रोखठोक मतांमुळे कायम चर्चेत राहत असते. हा तिचा बेधडक स्वभाव आता सगळ्यांनाच ठाऊक झाला आहे. तिने लिहिलेल्या पोस्ट काहींना पटतात तर काहीजण तिला विरोध दर्शवतात. हेमांगीने मीडियाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत छेड काढणाऱ्यांचा ती कसा समाचार घेते याचे किस्से सांगितले आहेत. कळवा स्टेशनवर असताना तिच्या मानेला एकाने हात लावला. तेव्हा हेमांगीने मागचापुढचा विचार न करताच त्याची कॉलर पकडून कानशिलात लगावली होती. त्यानंतर लगेचच तिला आपण स्वतःला सेव्ह केलं याचा फिल आला पण काहीतरी आपण कायदा हातात घेतला याचीही तिला जाणीव झाली. पण त्याक्षणी स्वतःला वाचवणं खूप महत्त्वाचं होतं.
या दोन्ही गोष्टी तिच्या लगेचच डोक्यात आल्या पण अशा गोष्टी ती तेव्हाही करत होती आणि आताही करते असे ती सांगते. मुलींच्या तोकड्या कपड्यांवर तर पुरुषांची वाईट नजर असते अशा वेळी हेमांगी एक उपाय करते जेणेकरून समोरचा व्यक्ती स्वतःच लाजून तिच्याकडे बघण्याचा नाद सोडून देतो. हा उपाय काय आहे यावर हेमांगी म्हणते की, “मला जर कोणी वाईट नजरेने जरी बघितलं तर मी त्याला लगेचच विचारते ‘क्या है?’.. ती सततची नजर खूप वाईट असते. पण कोणी माझ्याकडे जर बघायला लागलं तर मी आधी स्वतःकडे बघते आणि मग ‘ क्या है?’ असं स्पष्ट विचारते. रिक्षातून जातानाही मला असे अनुभव आले आहेत. मी जेव्हा शॉर्टस किंवा स्कर्ट वगैरे घालते तेव्हा ते हवेने उडतात. यामुळे आपल्या मांड्या दिसतात. तर त्या मांडीकडेही लोक वेड्यासारखे बघत बसतात. तेव्हा मी सरळ सांगते की, तुमको भी दिया है भगवान ने…उसको देखो, क्या है? असं म्हटलं की ते स्वतःच लाजतात.”
मराठी अभिनेत्री हेमांगीच्या या मतावर महिला वर्गच नाही तर पुरुष वर्गानेही सहमती दर्शवली आहे. तिचे हे रोखठोक मत अनेकांना पटले आहे तर काहींनी तिच्या या मतावर खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. पण तसं पाहिलं तर मुली महिलांनी अशा वाईट नजरेला ओळखलं पाहिजे. त्यावर गप्प बसून राहण्यापेक्षा जिथल्या तिथे हेमांगीसारखी उत्तरं द्यायला शिकलं पाहिजे. यामुळे समोरचा व्यक्ती वाईट हेतून तुमच्याकडे पाहण्याचे थांबवेल. हेमांगी कवी नुकत्याच एका जाहिरातीसाठी शूट करत होती तेव्हा तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळतेय हे कळल्यावर ती खूपच खुश झाली होती. अमिताभ बच्चन यांच्यासोबत जाहिरात करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता असे ती त्यावेळेस म्हणाली होती.