मराठी चित्रपट सृष्टीत अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांसारख्या बड्या अभिनेत्यांच्या चर्चा दररोज पाहायला मिळतात. मात्र त्यांच्यासोबत त्यावेळी काम केलेल्या अभिनेत्री मात्र प्रसिद्धीपासून दूरच असलेल्या पाहायला मिळाल्या. ह्या अभिनेत्रींमध्ये एका अभिनेत्रीचे नाव आवर्जून घ्यावे लागेल ते म्हणजे दिग्गज अभिनेत्री “रेखा राव”. प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आमच्यासारखे आम्हीच, शुभ मंगल सावधान आणि धरलं तर चावतंय अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. अमराठी असून देखील त्यांनी मराठी सृष्टीत नायिका म्हणून आपल्या अभिनयाचा पाय रोवला होता. आजही त्यांना वर्षा उसगावकर, अलका कुबल, किशोरी शहाणे, प्रिया बेर्डे, अश्विनी भावे, निवेदिता सराफ यांच्या तोडीस तोड असणारी अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.
मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटात देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. “हम दिल दे चुके सनम” ह्या हिंदी चित्रपटात त्यांनी नायिकेच्या आत्याची भूमिका साकारली होती. ८० ते ९० च्या दशकात मराठी चित्रपटाची नायिका बनून रेखा राव यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली होती. मात्र कालांतराने त्यांनी हिंदी मराठी सृष्टीतून काढता पाय घेतला. गेल्या बऱ्याच वर्षांपासून त्या कुठल्याच हिंदी किंवा मराठी चित्रपटात पाहायला मिळत नाहीत त्यामुळे एक काळ मराठी सृष्टी गाजवणारी ही नायिका आता कुठे असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. आज रेखा राव यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. रेखा राव या मूळच्या बंगलोरच्या इथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. शाळेत असल्यापासूनच रेखा राव यांना नृत्याची विशेष आवड होती त्यामुळे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे घेण्यास सुरुवात केली. राज कपूर सारख्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रेखा राव यांनी नृत्याची कला सादर केली होती. पुढे १०७९ सालच्या ‘अथेगे थक्क सोसे’ नावाच्या कन्नड चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. कन्नड चित्रपटातून प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्यांनी आपली पाऊलं मराठी सृष्टीकडे वळवली. धरलं तर चावतय, शुभमंगल सावधान, अनपेक्षित, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आमच्यासारखे आम्हीच, ईना मीना डिका, अशा बहुतेक चित्रपटातून त्यांनी आहोक सराफ यांची नायिका बनून प्रेक्षकांची पसंती मिळवली.
मराठी चित्रपटांची नायिका अशी ओळख मिळाल्यानंतर ततानी हिंदी चित्रपटामधून सहाय्यक भूमिका केल्या. तेहजीब, हम दिलं दे चुके सनम ता चित्रपटानंतर त्यांनी सर्व मंगल मंगलाये, शुभ विवाह या कन्नड मालिका गाजवल्या. रेखा राव या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीपासून दूर आहेत त्याचे कारण म्हणजे त्या सध्या बंगलोरला स्थायिक झाल्या आहेत. बंगलोरला गेल्यावर त्यांनी कन्नड चित्रपट आणि मालिकांमधून काम करण्यास सुरुवात केली यासोबतच त्या “अम्माज किचन राव ” या नावाने मेस चालवतात. कॉलेजच्या मुलांची, वृद्धांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी सुरू केलेल्या घरगुती जेवणाला चांगली मागणी मिळत आहे. यासोबतच रेखा राव यांनी आता ऍक्टिंगचे क्लासेस घेण्यास सुरुवात केलेली आहे. हिंदी ,मराठी भाषेसह कन्नड आणि इंग्रजी भाषेतून सुद्धा ते हे कोर्सेस उपलब्ध करून देत आहेत. प्रत्यक्षात आणि ऑनलाइन द्वारे त्यांनी हे क्लासेस सुरू केल्याने अनेक नवख्या कलाकारांना त्यांच्याकडून अभिनयाचे धडे घेता येणार आहेत.